दिल्ली : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी देशभरामध्ये सुरु आहे. चार टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. निवडणूकीपूर्वी पासूनच भाजपने जोरदार प्रचार आणि घोषणाबाजी सुरु केली होती. भाजपकडून अब की बार 400 पार चा नारा देण्यात आला होता. पूर्ण तयारीनिशी एनडीए आघाडी लोकसभा निवडणूकीला सामोरी गेलेली असली तरी अंतिम निर्णय हा मतदारांचा असणार आहे. त्यामुळे भाजपला बहुमत मिळाले नाही तर काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.
60 कोटी लाभार्थ्यांची मजबूत फौज
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भाजप आणि एनडीए आघाडीने बहुमत मिळवले नाही तर काय असा सवाल विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अमित शाह म्हणाले, “प्लॅन बी तेव्हाच बनवला जातो जेव्हा प्लॅन ए च्या यशाची शक्यता नसते. किंवा शक्यता 60 टक्क्यांपेक्षा कमी असते. मला पूर्ण विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठ्या विजयाने सत्तेमध्ये परतणार आहेत. मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. 60 कोटी लाभार्थ्यांची मजबूत फौज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभी आहे. त्यांना कोणतीही जात किंवा वयोगट नाही. ज्यांना सरकारी योजनांचा फायदा झाला आहे त्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी काय आहेत आणि 400 जागा का द्याव्यात,” असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
कलम 370 हटवण्यापेक्षा मोठे यश
पुढे अमित शाह म्हणाले, “कलम 370 वर प्रश्न विचारणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की काश्मीरमध्ये मतदानाची टक्केवारी 40 टक्क्यांच्या पुढे गेली आहे आणि कलम 370 हटवण्यापेक्षा मोठे यश काय असू शकते. सर्व कट्टरवादी गट आणि नेते मतदान करत आहेत. ते लोकशाही प्रक्रियेचा भाग बनले आहेत. यापूर्वी काश्मीरमध्ये निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे नारे देण्यात आले होते, मात्र आज शांततेत निवडणुका होत आहेत,” असे देखील अमित शाह यांनी मोदी सरकारचे यश सांगताना सांगितले.