श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे मोहोरवाडी शिवारात सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराच्या ग्रीलचा कडीकोंडा तोडून घरात झोपलेल्या वृध्द दांपत्याला मारहाण करत एकनाथ अंतू हराळ आणि उषा एकनाथ हराळ यांना गंभीर जखमी करत, त्यांच्या अंगावरील ९० हजार रुपये किमतीचे दागिने नेले. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी भेट देऊन पाहणी करत श्वानपथकाला पाचारण केले.
याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार तालुक्यातील कोळगाव येथील मोहोरवाडी परिसरात एकनाथ अंतू हराळ हे आपल्या पत्नीसह घरात झोपले असताना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी घराचा दरवाज्याची कडीकोंडा उघडून घरात प्रवेश करत त्यांची पत्नी उषा यांना मारहाण करत यांच्या कानातील तसेच अंगावरील दागिने ओरबाडले या झटापटीत वृध्द महिला गंभीर जखमी झाली तर एकनाथ हराळ यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करत ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले. यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी असणाऱ्या शरद मोहारे, भूषण मोहारे, नवनाथ मोहारे, सागर बाराथे हे घटनास्थळी दाखल झाले. परंतू तो पर्यंत चोर पसार झाले होते. यांनी जखमी वृद्ध दाम्पत्याला त्वरीत कोळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, तालुक्यातील पिंप्री कोलंदर चौफुला आणि ढवळगाव शिवारातही चोऱ्या झाल्याची माहिती समजते.