
पुणे विसर्जन मिरवणूक
वैभवशाली परंपरा म्हणून ओळख असलेल्या विसर्जन मिरवणुकीस शुक्रवारी सकाळी पावणे नऊला वाजता प्रारंभ झाला.अत्यंत उत्साही आणि आनंदाच्या वातावरणात सुरू झालेल्या मिरवणूकीत यंदा ‘स्पीकर’ च्या आवाजावर मर्यादा टाकली होती. स्पीकर व्यावसायिक आणि गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी चार ‘टॉप’ आणि चार ‘बेस’ वापरण्याची अनुमती दिली होती. परंतु या चार टॉप’ आणि ‘बेस’च्या माध्यमातून ‘स्पीकर’चा दणदणाट कायम राहीला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मध्यभागात डीजेचा आवाज तुलनेने कमी असल्याचा दावा पोलिसांनी केला. दुसरीकडे उपनगरांमध्ये मात्र डीजेचा दणदणाटच पाहिला मिळाला.
नागरीक विद्यानंद बापट यांनी ‘स्पीकर’च्या विरोधात आवाज उठविल्यामुळे गणेशोत्सवापुर्वीच ‘आवाज’ हा चर्चेचा विषय झाला होता. ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना केल्या गेल्या. यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता लवकर होईल अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात पोलिसांनी मिरवणुक कधी संपेल यापेक्षा सुरक्षितता महत्वाची ठरविली आणि वेळेच्या गणतीकडे दुर्लक्ष केले. परिणामी गेल्या वर्षीपेक्षा सुमारे ३ तास जास्त कालावधी मिरवणूक संपण्यास लागला. मुख्य विसर्जन मिरवणुक असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर शुक्रवारी मानाच्या आणि महत्वाची गणेश मंडळे सहभागी झाली होती.
बेलबाग चौक ( समाधान चौक ) येथे लक्ष्मी रस्त्यावरुन व शिवाजी रस्त्यावरून येणारी मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मानाची आणि महत्वाची मंडळे बेलबाग चौकातून मार्गस्थ होण्याची वाट इतर मंडळे पाहत होती. प्रमुख मंडळे मार्गस्थ झाल्यानंतरच बेलबाग चौकातून इतर मंडळे विसर्जन मिरवणुकीत दाखल झाली. प्रमुख गणेश मंडळांनी ढोल ताशा पथकांची दहा मिनिटांचे वादन याकडे देखील दुर्लक्ष केले. त्यामुळे देखील काहीसा उशीर झाला.
पोलिसांच्या नियमांकडे दुर्लक्ष
मिरवणुकीसाठी पोलिसांनी गणेश मंडळांना मिरवणुकीत दोन ढोल – ताशा पथक सहभागी करून घेण्यास आणि स्पीकर साठी प्रत्येकी चार बेस आणि टॉपसाठी परवानगी दिली. मध्यभागात ‘स्पीकर’च्या बाबतीत बहुतेक मंडळांनी मर्यादा पाळल्याचे चित्र दिसत होते. तर काही मंडळांनी दोन पेक्षा अधिक ढोल ताशा आणि इतर पथके लावली होती. दुसरीकडे चार बेस चार टॉप असले तरी आवाज मात्र मोठाच होता.
पोलिसांची रणणीती अपयशी?
मिरवणुकीत दोन मंडळातील अंतर जास्त पडू नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. अनेक ठिकाणी यासाठी अंतर कमी करण्याचे प्रयत्न केले जात असले तरी काही वेळा हे अंतर वाढल्याचे दिसले. शुक्रवारी रात्री ‘स्पीकर’ बंद झाल्यानंतर मिरवणुकीचा वेग आणखी मंदावला. काही मंडळांनी ‘ढोल – ताशा’ पथकांना निमंत्रित करून मिरवणुक पुढे चालू ठेवली. ‘स्पीकर’च पर्याय असलेली गणेश मंडळे ही जागेवरच थांबून होती. पहाटे सहाच्या ठोकल्या पुन्हा त्यांनी मिरवणूक सुरू केली. ती शनिवारी रात्री साधारण आठपर्यंत सुरूच होती.
Pune Ganpati Visarjan : पुण्यात 24 तासांनंतरही गणरायाचे विसर्जन बाकी, अनेक गणेश मंडळ विसर्जनाच्या प्रतिक्षेत