
पुणे गणेशोत्सव 2026
अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली. २५ सप्टेंबर सकाळी ६ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ या २४ तासांच्या कालावधीत ५ लाख ८० हजार २८० प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. यातून मेट्रोला एका दिवसात ८५ लाख ६१ हजार ८९५ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेतही मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०२४ च्या गणेशोत्सवात २० लाख ४५ हजार १०० प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता. २०२५ मध्ये ही संख्या वाढून ३७ लाख १७ हजार ५७८ झाली. यंदा हा आकडा ४८ लाख ३२ हजार ९१५ वर पोहोचला आहे. २०२५ च्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येत २९.९९ टक्के वाढ झाली आहे. तर २०२४ च्या तुलनेत २०२६ मध्ये प्रवासी संख्या १३६.३२ टक्क्यांनी वाढली आहे.
Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त
गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत मेट्रोच्या मार्गिका १ वर २५ लाख १५ हजार ५१६, तर मार्गिका २ वर २३ लाख १७ हजार ३९९ प्रवाशांनी प्रवास केला. मार्गिका १ मधून ४ कोटी १७ लाख ४६ हजार ६२६ रुपये, तर मार्गिका २ मधून ३ कोटी ३१ लाख ८१ हजार ७५१ रुपये महसूल मिळाला.
गणेशोत्सवाच्या कालावधीत महात्मा फुले मंडई स्थानक सर्वाधिक गर्दीचे ठरले. या स्थानकावर ६ लाख ८२ हजार ४७३ प्रवाशांची नोंद झाली. त्यातून १ कोटी १ लाख ८५ हजार २५५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर पीसीएमसी स्थानकावर ४ लाख ७२ हजार ६५८, स्वारगेटवर ४ लाख ३५ हजार ४८९, रामवाडीवर ४ लाख ५ हजार ४४७ आणि पीएमसी स्थानकावर २ लाख ६९ हजार ४७७ प्रवाशांची नोंद झाली.
गणेशोत्सवात मध्यवर्ती पुण्यात जाण्यासाठी मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांमधील जोडणीचा प्रवाशांना मोठा फायदा झाला. जिल्हा न्यायालय स्थानकावर १० लाख ३९ हजार ४५२ प्रवाशांनी मार्गिका बदलून पुढील प्रवास केला. विसर्जनाच्या २४ तासांतच १ लाख २२ हजार ५५२ प्रवाशांनी इंटरचेंज सुविधेचा वापर केला.
डिजिटल तिकिटांना पसंती
मेट्रोच्या तिकीट व्यवस्थेतही डिजिटल पद्धतीला प्रवाशांनी मोठी पसंती दिली. गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत ७१ टक्के प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर केला, तर २९ टक्के प्रवाशांनी कागदी तिकीट घेतले. तसेच एकूण ८६ टक्के प्रवाशांनी ऑनलाइन, यूपीआय किंवा कार्डद्वारे पैसे भरले. केवळ १४ टक्के प्रवाशांनी रोख रकमेचा वापर केला.
विसर्जनाच्या दिवशी ११ स्थानकांवर २० हजारांहून अधिक प्रवासी
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मेट्रोच्या तब्बल ११ स्थानकांवर २० हजारांहून अधिक प्रवाशांची नोंद झाली. महात्मा फुले मंडई स्थानकावर ७० हजार ३७५ प्रवाशांची सर्वाधिक नोंद झाली. त्यानंतर डेक्कन जिमखाना ६४ हजार ९३८, स्वारगेट ४८ हजार ९०६, पीसीएमसी ४३ हजार ४९१, रामवाडी ३७ हजार ८९४, पीएमसी ३६ हजार ५८८, वनाज ३० हजार ६८६, नळ स्टॉप ३० हजार ५१९, गरवारे कॉलेज २६ हजार ८३२, छत्रपती संभाजी महाराज उद्यान २३ हजार ३५० आणि पुणे रेल्वे स्टेशनवर २० हजार १४९ प्रवाशांची नोंद झाली.
Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल
उत्सव काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने मेट्रोची वारंवारिता पाच मिनिटांवर आणली होती. तसेच विसर्जनाच्या दिवशी २४ तास अखंडित सेवा देण्यात आली. स्वारगेट, महात्मा फुले मंडई आणि डेक्कन जिमखाना या गर्दीच्या स्थानकांवर वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या.
गणेशोत्सवात लाखो भाविकांनी पुणे मेट्रोवर दाखवलेला विश्वास अभिमानास्पद आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन पाच मिनिटांची वारंवारिता, २४ तास सेवा आणि प्रमुख स्थानकांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुणेकरांनी सार्वजनिक वाहतुकीला आणि डिजिटल तिकीट प्रणालीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व प्रवाशांचे आभार.
– श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
चौकट :
गणेशोत्सवात मेट्रोची विक्रमी भरारी :
एकूण प्रवासी : ४८,३२,९१५
एकूण उत्पन्न : ₹७.४९ कोटी
विसर्जनाच्या २४ तासांत : ५,८०,२८० प्रवासी
एका दिवसाचे उत्पन्न : ₹८५.६१ लाख
२०२५च्या तुलनेत वाढ : २९.९९%
डिजिटल तिकीट वापर : ७१%
सर्वाधिक गर्दीचे स्थानक : महात्मा फुले मंडई — ६,८२,४७३ प्रवासी