नाशिक : नाशिकमध्ये डॉक्टरांवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टरांवर झालेल्या या हल्ल्यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकमधील पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये सदर घटना घडली आहे. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. धारदार शस्त्राने डोक्यावर आणि मानेवर सपासप केले वार केले गेले. सुयोग हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात घटना घडली आहे. यामध्ये संचालक गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
नाशिकमध्ये झालेल्या या हल्ल्याच्या घटनेनंतर सुयोग हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टर राठी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधिक तपास करत असून हल्ल्याचा कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.