
hospital
BMC Kasturba Hospital Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कस्तुरबा रुग्णालयात मानसेवी संवर्गातील विविध पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यासाठी नवीन जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ६ रिक्त पदांची भरती केली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित अटींनुसार अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदांचा कार्यकाल १५ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ पर्यंत असणार असून कंत्राटी तत्त्वावर दर १७९ दिवसांनी १ दिवसाचा तांत्रिक खंड दिला जाईल. मानसेवी सहाय्यक क्ष-किरण शास्त्रज्ञ १ पद, मानसेवी भिषक ३ पदे, मानसेवी शल्यचिकित्सक १ पद आणि मानसेवी बालरोग चिकित्सक १ पद अशा एकूण ६ जागांसाठी ही भरती आहे.
संबंधित पदांसाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार करता, उमेदवाराकडे संबंधित विषयात एम.डी. किंवा एम.एस. पदवी असणे आवश्यक असून, पदवीनंतर २ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे अनिवार्य आहे. तसेच एम.एस. किंवा एम.डी. पदवीनंतर १ वर्षापेक्षा जास्त काळ कस्तुरबा रुग्णालयात काम केलेल्या उमेदवारास निवडीमध्ये प्राधान्य दिले जाईल.
Netflix Scholarship 2026: नेटफ्लिक्स आणि IICT कडून ‘या’ कोर्सेससाठी विशेष स्कॉलरशिप जाहीर!
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना संचालक / वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय यांच्या २५ मार्च २०१४ च्या परिपत्रकानुसार दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल. नियुक्ती झालेल्या मानसेवी तज्ज्ञांना शनिवारी व रविवारी वगळता आठवड्यातून ५ दिवस आणि दररोज ४ तास काम करावे लागेल.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २७ ऑगस्ट २०२६ ते ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुरू राहणार असून, इच्छुक उमेदवारांनी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्ट्या, शनिवार व रविवार वगळून) सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत रुग्णालयाच्या कार्यालयात आपले अर्ज प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतींसह सादर करावेत. अर्जासोबत एम.एस./एम.डी. पदवी व प्रयत्न प्रमाणपत्र, एमएमसी नोंदणी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि प्रोफेशनल इंडेम्निटीची प्रत जोडणे बंधनकारक आहे.