
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर गंभीर आरोप
‘अमेडिया’ कंपनीच्या जमिन प्रकरणावरुन वाद
जिजाई बंगला अडकला वादाच्या भोवऱ्यात
Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे जोरदार चर्चेत आले आहेत. पार्थ पवार यांच्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या जमिन प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. दरम्यान आता हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे.
“कोंढवा येथील जमीन प्रकरणात उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये यामध्ये नेमके के घडले आहे हे समोर येईल. माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. या व्यवहाराबद्दल मला काही माहिती नाही. माझ्या माहितीनुसार हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. नेमण्यात आलेली समिती एका महिन्यात आपला अहवाल देणार आहे”, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची कंपनी एका जमिनीच्या व्यवहारामध्ये अडकली. कोट्यवधींची जमीन कमी किंमतीमध्ये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी अगदी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी अजित पवारांवर तोंडसुख घेतले आहे. या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनी अमेडिया संबंधित एक अर्थिक व्यवहार घोटाळा प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे. पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटी रुपयांत विकलेल्या प्रकरणाची माहिती समोर आली आहे. या जमीन व्यवहारात गैरप्रकार झाले असून केवळ 500 रुपयांच्या स्टँपड्युटीवर हा व्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यावरुन विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे.