Raakh Review : धक्कादायक गुन्हेगारीचा थरार, ‘राख’ खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक...
क्राईम, भ्रष्ट राजकारण आणि पोलिस तपासाचा रोमांचक यांचे थरारक मिश्रण असलेली नवीन ‘राख’ वेब सीरीज ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सत्य आणि अन्यायातील टोकाच्या संघर्षात गुंतवणारी ही कथा एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्षाची झलक दाखवते. गुन्हेगारी विश्वाच्या गूढतेला समोर आणणारी ही कथा, प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवते. गुन्हेगारी थराराने प्रेक्षकांचे मन जिंकले असून ही वेबसीरीज प्रेक्षकांना २८ मार्चपासून ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीवर पाहायला मिळेल.
थरारक कथा आणि दमदार अभिनय!
‘राख’च्या केंद्रस्थानी आहे इन्स्पेक्टर अभय अरविंद जाधव, जो आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणारा पोलिस अधिकारी आहे. कोणत्याही राजकीय दबावाखाली न झुकणाऱ्या अभयच्या आयुष्यात तोवर मोठी वादळं येत नाहीत, जोवर त्याचा जिवलग मित्र आणि सहकारी सुमीत एका भव्य पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी निर्घृणपणे हत्या झालेल्या अवस्थेत सापडत नाही. हा खून केवळ एक गुन्हा नसतो, तर मोठ्या कटाचा भाग असतो, जो अभयला गुन्हेगारी नेटवर्कच्या खोल गर्तेत ओढून नेत असतो.
तपास सुरू होताच, एका मागोमाग एक रहस्य उलगडू लागतात. प्रत्येक संशयितावरून दिशाभूल करणाऱ्या पुराव्यांमुळे पोलिस तपासाचा सस्पेन्स आणखी गडद होतो. अभयच्या जीवनातील व्यक्तिगत संघर्षही त्याला सतावत असतो—एकीकडे कर्तव्य आणि दुसरीकडे कुटुंब. त्याचा भाऊ एका मोठ्या ड्रग्स प्रकरणात अडकतो, तर आई आपल्या दोन मुलांमध्ये फसलेली असते. या सर्वांचा त्याच्या मानसिकतेवर होणारा परिणामही कथा अधिक गुंतागुंतीची बनवतो.
फॉरेन्सिक तज्ज्ञ ऋद्धी, जी केवळ अभयची पत्नी नसून त्याच्या शोध मोहिमेतील महत्त्वाची भागीदार आहे, तिच्या वेगळ्या दृष्टीकोनातून तपासाला नवे वळण मिळते. तसेच, संतोष पंवार या हताश पित्याच्या सूडयात्रेने ‘राख’ला एक नवा आयाम मिळतो. आपली मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तो सत्याचा पाठलाग करतो आणि त्याच्या शोधात अनेक धक्कादायक सत्य समोर येतात.
‘राख’ का पहावी?
लग्नाच्या ७ महिन्यांनंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झाली आई, बाळासोबत शेअर केले कपलने रोमँटिक फोटोज्
प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद!
‘राख’ प्रेक्षकांना एवढी आवडत आहे की प्रत्येक भागानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक समीक्षकांनी या सिरीजला “नेहमीच्या पोलिस-थ्रिलरपेक्षा वेगळी आणि अधिक गूढ” असे संबोधले आहे. विशेषतः अभयच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्याने दिलेला अभिनय खूप प्रशंसनीय आहे.
“राख फक्त एक सिरीज नाही, ती एक अनुभव आहे!” – असे चाहत्यांचे मत आहे. वेगवान कथा, जबरदस्त रहस्य आणि उत्कंठावर्धक सस्पेन्स यामुळे ही वेब सिरीज प्रत्येक थ्रिलर प्रेमींसाठी एक न चुकवण्यासारखा अनुभव ठरत आहे.
सत्याचा विजय होईल की अन्यायाचा अंधार कायम राहील? हे पाहण्यासाठी ‘राख’ नक्की बघा!