
DCM Eknath Shinde Press Conference on Thackeray Brothers Alliance political news
एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “ठाकरे बंधूंचा अजेंठा कुठे आहे? एक तरी शब्द विकासावर बोलले का? जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार? असे प्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला. पुढे ते म्हणाले की, यांना आता मराठी माणूस आठवला का? मराठी माणूस जेव्हा मुंबईबाहेर फेकला गेला आणि मराठी माणसाचं खच्चीकरण झालं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का?” असे आक्रमक पवित्रा एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंची युती तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा; मविआचे होणार काय? शरद पवार फिरवणार भाकरी
“जेव्हा निवडणूका येतात तेव्हा बोर्ड लागतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आणि मराठी माणूस मुंबईपासून तोडणार? यांनी एक तरी मराठी माणसाला घर दिलं का? एका तरी गिरणी कामगाराला घरं दिलं का? आम्ही साडे बारा हजार लोकांना घरं दिली. आम्ही 1 लाख गिरणी कामगारांना घरं देणार आहोत. 35 ते 40 लाख लोकांना या क्लस्टरच्या योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने घेणार आहोत. आहे का योजना तुमच्याकडे? इतक्या वर्षे सत्ता गाजवली अन् सत्तेमध्ये राहिले…काय केलं तुम्ही मुंबईकरांसाठी,” असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : ”माझ्याकडे यांचे असंख्य व्हिडिओ आहेत..! राज ठाकरे करणार महायुतीची पोलखोल?
“मुंबईकर सुज्ञ आहेत. या निवडणुकीमध्ये त्यांना विकास हवा आहे. एवढे वर्षे सत्तेमध्ये राहिले तरी एक तरी उद्यान तयार केलं का? आम्ही केलं. महालक्ष्मी रेसकोर्स 125 एकर जागा आणि कोस्टल रोडची 170 एकर जागा घेण्याची हिम्मत आमच्या सरकारने दाखवली. 300 एकरचे मुंबईमध्ये जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क होत आहे. हे मुंबईकरांसाठी कोण देत आहे तर आमचं सरकार देत आहे. हठाकरे बंधू हे जे काही एकत्र आले आहेत ते फक्त स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. स्वतःच्या खुर्चीसाठी ते एकत्र आले आहेत,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
ही स्वार्थाची युती
“उद्धव ठाकरे हे पूर्वी राज ठाकरेंबाबत काय काय बोलले आहेत ते जरा बघा. म्हणजे एखादा माणूस असा पूर्ण 360 डिग्री बदलतो. त्यांची युती तत्वासाठी नाही तर स्वार्थासाठी आहे. स्वार्थ संपला की युती संपली असं यांचं आहे. हे कामापुरता मामा आहेत. हे विकासाची नाही तर खुर्ची, सत्ता आणि मतांसाठी केलेले राजकारण आहे,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुच्या युतीला लगावला आहे.