ठाकरे बंधू युती जाहीर झाली असून राज ठाकरे भाषणामध्ये सीएम फडणवीसांचे व्हिडिओ व्हायरल करणार असल्याचे सांगितले (फोटो - सोशल मीडिया)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये एकत्र पत्रकार परिषद घेत मुंबई पालिकेसाठी युतीची घोषणा केली. यावेळी माध्यमांनी ठाकरे बंधूंना प्रश्न विचारत राजकीय आढावा घेतला. यावेळी जुन्या आणि सोडून गेलेल्यांना पक्षात प्रवेश देणार का, असा सवाल माध्यमांनी विचारला असता, या जर तरच्या प्रश्नांना अर्थ नसतो. येऊ तर देत पहिलं, असे म्हणत राज ठाकरे यांनी जर तर वर भाष्य करण्यास नकार दिला. त्यांनी यावेळी मुंबई महापालिकेवर मराठी माणूसच महापौर होईल असे ठामपणे सांगितले. मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल आणि मनसे-शिवसेनेचाच महापौर असेल असे जाहीर केले. तर भाजप आणि शिंदे सेनेच्या टीकेलाही त्यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंची युती तर काँग्रेसचा स्वबळाचा नारा; मविआचे होणार काय? शरद पवार फिरवणार भाकरी
पुढे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, “एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ फिरत आहे.त्यात ते अल्लाह हाफीज म्हणत आहेत. त्यांनी मला या गोष्टी सांगू नये. माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत.ते काय बोलतील त्यावर मी व्हिडीओ लावणार आहे, असा इशाराही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. राज ठाकरे यांच्या या एका वाक्यानंतर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ सुरु झाला. यामुळे पालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये जोरदार धुराळा उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे बंधूंच्या या युतीच्या प्रचारावेळी अनेकांच्या पोलखोल होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : “हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून मराठ्यांना लागलेला श्राप…; संजय राऊत म्हणाले काय?
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, यावेळी भाजपला काय हवं ते भाजपने पाहावं.मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहत आहोत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.तर शरद पवारांशी चर्चा सुरू आहे. आम्ही आमची युती जाहीर केली आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. जे भाजपातील अस्सल मराठीही येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे.काही भाजपमध्ये आहेत, ज्यांना भाजपचं सहन होत नाही, ते येऊ शकतात, अशी खुली ऑफरही उद्धव ठाकरे यांनी दिली. काँग्रेसने स्वबळावर लढायचं जाहीर केलं. आता आणखी का बोलायचं. कोण काय म्हणतंय त्याच्याशी कर्तव्य नाही. मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला काय पाहिजे ते आम्ही पाहत आहोत. सर्व पक्ष बाहेर पडून आघाडी आबाधित आहे, असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.






