फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील देवबांध ते शिरसगाव दरम्यानचा रस्ता मुसळधार पावसामुळे पूर्णतः जलमय झाला आहे. मागील दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार कोसळत असून, खोडाळा परिसरासह अनेक गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर आला आहे. देवबांध-आडोशी नदीला आलेल्या पुरामुळे रस्त्यावर पाणी साचले असून, संपूर्ण मार्गाने वाहतूक बंदप्राय झाली आहे. नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, जिल्हा परिषद बांधकाम विभागावर दुर्लक्षाचा आरोप करण्यात येत आहे.
या रस्त्यावरील समस्यांकडे प्रशासनाने अनेकवेळा लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. विशेषतः जिथे पाणी साचते त्या भागाची पाहणी १०-१५ दिवसांपूर्वीच बांधकाम विभागाने केली होती. मात्र, केवळ औपचारिक भेटी घेऊन, फोटोसेशनसारखा प्रकार करून निघून जाण्यात आले. प्रत्यक्षात गटाराचे योग्य नियोजन, पाण्याचा निचरा होईल अशा स्वरूपातील ड्रेनेज यंत्रणा वा पूलाच्या उंचीवाढीचा कोणताही प्रयत्न झालेला नाही.
या मार्गावर पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचते, मात्र यंदा पाण्याचा जोर अधिक असून प्रवाशांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक, तसेच पायी प्रवास करणारे ग्रामस्थ प्रचंड त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की, अपघात होण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थी, रुग्ण, वृद्ध नागरिक यांना अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
देवबांध नदीला पूर आला की रस्त्यावरून पाणी वाहू लागते, हे ठाऊक असूनसुद्धा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून फक्त तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. या ठिकाणी उंच पूल उभारणे, पाण्याचा निचरा होईल अशी गटारे आणि सांडपाण्याचा मार्ग निर्माण करणे, हे कायमस्वरूपी उपाय गरजेचे आहेत. मात्र, प्रत्येक पावसाळ्यातच नागरिकांचे हाल होतात, आणि प्रशासन मौन धारण करत असल्याची भावना ग्रामस्थांत आहे. या परिस्थितीमुळे स्थानिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर योग्य उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात.