बिग बॉस मराठी 3 च्या घरातून आज तृप्ती देसाई या बाहेर पडल्या आहेत. यावेळी तृप्ती देसाई भावूक झालेल्या दिसल्या. घरातील सदस्य देखील तृप्ती ताईंना निरोप देताना भावूक झाले. यावेळी तृप्ती देसाई यांनी सर्वांना चांगलं खेळण्याचा सल्ला दिला. तसेच कधीही एक कॉल करा तृप्ती देसाई तुम्हाला नक्की मदत करणार, असं अश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं.
राज्यभरात ‘ताईगिरी’ने धुमाकूळ घालणाऱ्या तृप्ती देसाईंचा वेगळा पैलू ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळाला होता. मात्र 49 दिवसांच्या प्रवासानंतर तृप्ती देसाईंना निरोप द्यावा लागला. तृप्तीताईंना टाटा-बाय बाय करताना इतर स्पर्धकांना अश्रू अनावर झालेच, मात्र खुद्द सूत्रसंचालक महेश मांजरेकरही हळहळले.
महेश मांजरेकर यांनी तृप्ती देसाई यांचे एलिमिनेशन झाल्याचं सांगितलं. ही घोषणा होताच सर्वच स्पर्धकांच्या अश्रूंचा बांध फुटला. गायत्री दातार हमसाहमशी रडत होती. तर मीरालाही अश्रू अनावर झाले होते. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत तृप्ती देसाई घराबाहेर निघत होत्या, तरी गायत्री त्यांना बिलगून ओक्साबोक्शी रडतच होती. त्यामुळे तृप्तीताईंचाही पाय निघत नव्हता. यावेळी संतोष चौधरी ही काहीसे भावनावश झाल्याचं दिसलं. तर स्नेहानेही आपल्यात कुठलेच वैयक्तिक वाद नसल्याचं सांगत माफी मागितली. तर उत्कर्ष शिंदेनेही त्यांना नॉमिनेट केल्याबद्दल क्षमा मागितली.
दरम्यान, ‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये विशाल निकम, तृप्ती देसाई, जय दुधाणे, सोनाली पाटील आणि मीनल शाह हे पाच स्पर्धक घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. शनिवारी यापैकी विशाल आणि मीनल सेफ असल्याची घोषणा महेश मांजरेकर यांनी केली.