Coastal Road News : मुंबईतल्या वरळी ते मरीन ड्राईव्ह या दहा किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या कोस्टल रोडवर प्रवेश करण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
सर्व प्रकारातल्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी
कोस्टल रोडवर सर्व प्रकारातल्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. यामध्ये ट्रॅक्टर, मालवाहू वाहने, ट्रेलर, मिक्सर या वाहानांचा समावेश आहे. तसेच, दिव्यांग व्यक्तींसाठीच्या स्कूटर, मोटारसायकल, साई़ड कार, सायकल ही वाहनेही निषिद्ध असतील. तसेच दुचाकी, साधी सायकल, तीन चाकी वाहने, टांगा गाडी, हातगाडी, बैलगाडी, रिक्षा यांना कोस्टल रोडवर प्रवेश करता येणार नाही.
प्रवास अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण होणार
कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं असून यामध्ये दहा किलोमीटर प्रवास करता येणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी असा हा रस्ता असेल. सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत कोस्टल रोड प्रवासासाठी खुला असेल. प्रकल्पाचं उर्वरित काम तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. तब्बल पाऊण तासांचा प्रवास अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आहे. या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
कोस्टल रोड प्रकल्प सर्वसमावेशक
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे लोकार्पण सोहळ्यात बोलताना म्हणाल्या की, कोस्टल रोड प्रकल्प सर्वसमावेशक असा आहे. नुकसानभरपाईपोटी मच्छिमारांना तब्बल १३७ कोटी रुपये दिलेआहेत.
८ मार्च या महिला दिनाचं औचित्य साधून स्वयंचलित वाहनातून आलेल्या मनपाच्या महिला अधिकारी, महिला बचत गटाच्या प्रतिनिधींना घेऊन जाणाऱ्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधोरेखित करणाऱ्या बसेसला झेंडा दाखवून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाचा शुभारंभ केला.
कोस्टल रोड टोलमुक्त असणार आहे. मनपाच्या महिला अधिकारी आणि कोळी महिलांना कोस्टल रोडवर पहिल्यांदा प्रवास करण्याची संधी मिळाली. या प्रकल्पामध्ये वैशिष्ट्यपूर्ण इंजिनिअरिंग फिचर आहेत, शिवाय यात जुळे बोगदेही आहे. या प्रकल्पामुळे वेळेमध्ये ७० टक्क्यांची बचत होणार असून ३५ टक्के इंधनाची बचत होणार आहे.