Big Breaking: इक्बालसिंह चहल यांची बदली; फडणवीसांच्या खात्यात मिळाली 'ही' मोठी जवाबदारी
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अपर सचिव इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आली आहे. इक्बालसिंह चहल हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. याआधी त्यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार होता. बदली झाल्यानंतर आता त्यांच्याकडे गृह विभागाचे अपर सचिव म्हणून जवाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच इक्बालसिंह चहल हे आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गृहविभागाचे मुख्य अपर सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण राज्यात वाढताना दिसत आहे. या सर्व घटनांवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांची राज्याच्या गृह विभागाच्या मुख्य अपर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आली होती. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. राज्यात घडत असलेल्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इक्बालसिंह चहल यांच्याकडे खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपविण्यात आला आहे.