ICC will be Announced The Schedule of Champions Trophy on This Day
Champions Trophy 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाठवलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकाला ग्रीन सिग्नल दिला होता. पाकिस्तान पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार आहे. मात्र, भारत सरकारने टीम इंडियाला सीमेपलीकडे पाठवण्याबाबत अद्यापि आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, टीम इंडिया पाकिस्तानला न गेल्यास त्यांचे सर्व मॅचेस श्रीलंकेत होऊ शकतात.
भारत सरकारकडून अद्यापि अधिकृत विधान नाही
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवण्याबाबत बीसीसीआय किंवा भारत सरकारने अद्यापि कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. पण, या वर्षी मे महिन्यात बीबीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले होते की, टीम पाकिस्तानला जाण्याचा निर्णय फक्त भारत सरकारच्या हातात आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने श्रीलंकेत होणार असल्याची बातमी आहे.
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार भारताचे सामने येथे होणार
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अ गटात समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये यजमान पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशदेखील आहेत. त्या वेळापत्रकानुसार टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहेत.
यापूर्वीही पाकिस्तानात जाण्यावरून झाला वाद
याआधी पाकिस्तानने 2023 च्या आशिया चषकाचे आयोजनही केले होते. परंतु, टीम इंडियाने सीमा ओलांडण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत, आयसीसीने हायब्रीड मॉडेल सादर केले. ज्या अंतर्गत भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. याच कारणामुळे आशिया कप 2023 च्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांचे यजमानपद पाकिस्तानला गमवावे लागले होते.