जालना : आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करत असतो. असेच एका सहाय्यक महावितरण (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) अभियंत्यांला त्याचा आनंद चांगलाच महागात पडला आहे. या जालन्यामधील महावितरण कार्यालयात बदली झाली त्यामुळे त्याने स्वतःची डिजेवर मिरवणूक काढली आणि जल्लोष साजरा केला परंतु या सहाय्यक अभियंत्यांला हा जल्लोष चांगलंच महागात पडला आहे. या अभियंत्यांसह २० ते ३० जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर महावितरणनं देखील या अभियंत्याच्या मिरवणुकीवर नागरिकांनी केलेल्या टिकेनंतर त्याला निलंबित करण्यात आलं आहे. प्रकाश चव्हाण (Prakash chavan) असं बदली झालेल्या अभियंत्याचं नाव आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण हे आधी जालन्यातील कन्हैयानगर भागातील महावितरण कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्या विरोधात ग्राहक आणि नागरिकांच्या तक्रारी आल्यानं त्यांची महिनाभरापूर्वी रत्नागिरी येथे बदली करण्यात आली होती. पण तेथून आणखी त्यांची बदली जालन्यातील महावितरणच्या फेज थ्रीमध्ये करण्यात आली.
बदलीचा चव्हाण आणि त्यांच्या अखत्यारित असलेल्या कॉन्ट्रॅक्टरना आनंद झाला. कॉन्ट्रॅक्टरांनी चव्हाण हे शहरात दाखल होताच त्यांची पोलिसांची परवानगी न घेता डीजेवर डान्स करत मिरवणूक काढली. या मिरवणुकीनंतर सदर बाजार पोलिसांनी अभियंता प्रकाश चव्हाण यांच्यासह 20 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केला. आणि महावितरणवर झालेल्या शहरातील नागरिकांकडून टीकेनंतर प्रकाश चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश महावितरणने काढले आहे. त्यामुळे मिरवणूक अखेर या सहाय्यक अभियंत्यांच्या चांगलीच अंगलट आलेली पाहायला मिळाले.