अयोध्येतील बाबरी मशीद शतकानुशतके जरी उभी होती तरी त्या भोवतीचे वादंग कधीच कमी झाले नव्हते. मशीद उभी करण्यासाटी मोगल घराण्याचा संस्थापक पहिला बादशहा बाबर याचा वजीर मीर बाकीने १५२८ मध्ये अयोध्येतील राम मंदिर पाडून तिथे बाबरी मशीद उभी केली. अयोध्येतील पाडलेल्या पुरातन राम मंदिराच्या आठवणींचे कढ देशातली तमाम भाविक हिंदुंच्या गळ्यात तेव्हापासूनच दाटत होते.
लालाकृष्ण अडवाणी यांनी अलिकडेच राष्ट्रधर्म या हिंदी मासिकात, ‘श्रीराम मंदीर : एक दिव्य स्वप्न की पूर्ती’ हा लेख लिहून त्यांच्या गाजलेल्या सोमनाथ अयोध्या रथयात्रेच्या आठवणी लिहिल्या आहेत. तो विशेषांक अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन व रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना होत असताना देशभरातून आलेल्या अतिविशेष अतिथींना दिला जाणार आहे. त्यात ते म्हणतात की, जेव्हा हा रथ गावांतून जात असे, तेव्हा कुठून कुठून ग्रामीण भागातून लोक रथाजवळ येत, माझी पाठ थोपटत, मला शुभेच्छा देत आणि जय श्रीरामाचा घोष करून निघून जात. राम लोकांच्या भावविश्वात किती खोलवर सामावला आहे याची जाणीव त्या रथयात्रेत पावलोपावली येत होती.
ती यात्रा म्हणजे भारतीय राजकारणातली रामाच्या स्थापनेची सुरुवात होती असेही म्हणता येईल. त्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या हिंदू महासभेच्या अनेक अध्यक्षांनी, नेत्यांनी राम जन्मभूमीतील मुस्लीम अतिक्रमण हटवण्याचा आग्रह धरला होता. त्याचबरोबर काशीतील विश्वेश्वर, मथुरेतील कृष्ण जन्म मंदीर यांच्याही मुक्तीसाठी हिंदू समाज तळमळत होता. हिंदू महासभेच्या नंतर उगवलेल्या विश्व हिंदू परिषदेनेही या तीन्ही स्थानांचे आंदोलन चालवले होते.
भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमांतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू अस्मितेवर जमलेली धूळ झटकण्याची मोहीम हाती घेतली. बदजरंग दलासारख्या अधिक जहाल संघटनांची जोड विश्व हिंदू परिषदेला मिळाल्यानंतर राम जन्मभूमी आंदोलन गती घेऊ लागले. विश्व हिंदू परिषदेने हिंदू अस्मिता जागृत करण्यासाठी १९८३ साली एकात्मता यात्रा काढली त्याला मिळालेल्या प्रतिसादाने विहिंप अधिक जोमाने कामाला लागली.
त्याचवेळी भारतीय जनता पक्ष राजकारणात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता. या पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीवर इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येची छाया पडली होती. काँग्रेसच्या बाजूने सहानुभूमीतीची जी त्सुनामी उठली, त्यात भाजप वाहूनच गेला म्हटले तरी चालेल. अडवाणी-वाजपेयींसारखे पक्षाचे दिग्गज पराभूत झाले होते; तर फक्त दोन खासदार संसदेत पोचले होते. त्यानंतर पक्षाच्या वाढीसाठी भाजपने जो विचार विनिमिय केला त्यात त्यांना रामाचा आधार सापडला. त्यंनी पक्षाच्या जाहीरनाम्यातच अयोध्येत राम मदिर उभे करणार हे कलम दाखल केले. नंतरच्या १९८९ च्या निवडणुकीत भजापाने बऱ्यापैकी जागा कमावल्या; पण त्यांची खासदारांची संख्या लोकसभेत ८६ वर थांबली होती; तर मतांची टक्केवारी दहा-अकरा टक्के इतपतच होती.
या निवडणुकीनंतर भाजपचे अध्यक्षपद लालाकृष्ण अडवाणींकडे आले आणि भाजपने १९९० ला ऐतिहासिक रथयात्रा काढून विहिंपच्या व संघाच्या राम जन्मभूमी आंदोलनात उतरण्याचा निर्णय केला. हा निर्णय केवळ भाजपच्या राजकारणाला नव्हे तर देशाच्या राजकारणालाच मोठी कलाटणी देणारा निर्णय ठरला.
रामाच्या नावावर देश हालतो, देश भावविवश होतो हे त्या यात्रेतून भजपाच्या ध्यानी आले. अडवाणींनी लिहिले आहे की भाजपने यात्रा काढून राम जन्मभूमी आंदोलनात उडी घेण्याचे ठरवले आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी ती यात्रा काढावी हेही ठरवले. एकदा यात्रा काढायची ठरल्यावर आमच्या समोर सोमनाथपासून सुरुवात करणे हा एकमेव नैसर्गिक पर्याय होता. अरबी समागराच्या किनाऱ्यावरील प्रभास पट्ट्ण येथे वसलेले ज्योतिर्लिंग सोमनाथाचे मंदिर हेही परकीय तुर्क मुस्लीम आक्रमकांनी अनेकदा फोडले होते. नंतरच्या गुजराती, राजस्थानी राजांनी ते पुन्हा उभे केले. स्वातंत्र लढ्यातील महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल अशा नेत्यांनी ठरवले आणि नेहरुंसारख्या अन्य काही काँग्रेस नेत्यांचा विरोध डावलून, सोमनाथ मंदिराची उभारणी काँग्रेस सरकारने केली. राष्ट्रपती झाल्यानंतर बाबु राजेंद्र प्रसादांनी सोमनाथला जाऊन शंकराची पुन्हा सन्मानाने प्रतिष्ठापना केली. तोच आदर्श आम्हाला अयोध्येसाठी हवा होता.
माझ्या बरोबर भाजपचे सरचिटणीस प्रमोद महाजन आणि पक्षातील तरूण नेते नरेंद्र मोदी हे रथ यात्रेचे सारथ्य करत होते. मला वाटते मोदींच्या त्या राम भक्तीचे फळ म्हणूनच आज त्यांना अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात प्राण प्रतिष्ठापना करण्याचे भाग्य लाभले आहे. रामानेच त्याच्या या भक्ताची निवड या कार्यासाठी केली आहे, असेही कौतुकौद्गार अडवाणींनी त्या लेखात काढले आहेत.
अडवाणींची ती ऐतिहासिक रथयात्रा देशाच्या चौदा राज्यंतून फिरून अयोध्येत पोचणार होती ‘सौगंध श्री राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे’ आणि ‘जय श्री राम’ या घोषणा देत यात्रा देशात फिरत होती. लोक उत्साहाने त्यात सहभागी होत होते. सप्टेंबर १९९० मध्ये सुरु झालेली यात्रा अयोध्येत पोहोचण्याच्या आधीच बिहारमध्ये लालु प्रसाद यादवांच्या जनता सरकारने ती अडवली. अडवाणींना डुमका येथे शासकीय अतितीगृहातच नजरकैदेत ठेवले ती तारीख होती ऑक्टोबर २२ आणि आता जानेवारी २२ रोजी जेव्हा त्याच अयोध्येत पंतप्रधान या नात्यने नरेंद्र मोदी जेव्हा श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतील, ‘तेव्हा मंदिर वही बनाएंगे’चा नारा देणारे आता थकलेले नव्वदी पार केलेले अडवाणी ती घोषणा प्रत्यक्षात उतरल्याचे बघण्यासाठी अयोध्येत उपस्थित असतील. ते लेखात म्हणतात की मला या क्षणी कै. अटलबिहारी वाजपेयींची खूप आठवण येते आहे !
अडवाणींना अटक झाल्यानंतर भाजपने तातडीने केंद्रातील विश्वनाथ प्रताप सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळले. मंदिर आंदोलनाचे वर्णन समाजवादी व कम्युनिस्ट विचारांचे लालुंसारखे नेते कमंडलु आंदोलन असे करीत. हे आंदोलन देशातील साधु संतांनी चालवले आहे अशी ती उपहासात्मक भाषा होती. आणि त्या कमंडलुला टक्कर देण्यासाठी व्ही. पी. सिंग, लालु, मुलायम आदि मंडळींनी मंडल आयोगाचा अहवाल लागू करून देशातील राजकीय वातावरण आणखी गढूळ करून टाकले. ओबीसींचे एक नवे मोठे राजकारण उभे राहिले त्यात भाजपसह काँग्रेस पक्षालाही अनेक निवडणुकांत फटके पटत राहिले. आजही जेव्हा भाजपाची निवडणुकीची ताकद प्रचंड वाढलेली आहे आणि पुन्हा एकदा रामाची लाट देशात दिसते आहे तेव्हा लालु-मुलायम यांच्या जोडीला, नीतीश कुमार, शरद पवार असे भाजपा विरोधी नेते मंडल दोनची भाषा करत आहेत. पण हे सारे नेते विसरले की, राम मंदिर आंदोलन हे फक्त भगवी वस्त्रे धारण करणाऱ्या अल्पसंख्य मंडळींचे नव्हते व नाही. हे आंदोलन तळा-गाळातली रामभक्त सर्वसामान्य कोटी कोटी मतदारांचे आंदोलन बनले होते. १९८९ नंतर लगेच १९९१ ची जी निवडणूक झाली त्यात भाजपची खासदारांची संख्या दीड पटीने वाढून प्रथमच तीन आकड्यात गेली. कमळ चिन्हावर १२० खासदार लोकसभेत पोहोचले होते. भाजप मतांची टक्केवारी २० टक्क्यांवर पोचली होती. त्या नंतरच्या दशकात देशाने मोठा हिंसाचार पाहिला. समाजातील धर्मभेदाच्या भिंती अधिकाधिक गडद होत गेल्या. बाबरी पडल्यावर लगेचच दंगली उसळल्या, त्या पाठोपाठ अतिरेकी घटकांनी मुंबईत साखळी बाँबस्फोट केले.
रथयात्रेनंतर विहिंपने राम मंदिरासाठी शीला पूजन, विटा जमवणे, कारसेवा अशी आंदोलने केली त्यात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत होते. विशेषतः कारसेवकांचे लाखोंचे जथ्थे अयोध्येत जमा होत होते. तिथे मुलायम सरकारने कारसेवकांवर लाठीमार, अश्रुधुराच्या वापराबरोबरच गोळाबारही केला. त्यात शेकडो कारसेवक मृत झाले. आता अयोध्येत रामलल्ला विराजमान होत असताना त्या मृत कारसेवकांच्या नातेवाईकांनाही सन्मानाने अयोध्यते येण्याची निमंत्रणे दिली गेली आहेत.
६ डिसेंबर १९९२ रोजी अशाच कारसेवा आंदोलनात लाखो कारसेवकांनी मशिदीवर हल्लाबोल केला. त्या वेळी उत्तर प्रदेशात भाजपचे नेते कल्याण सिंग हे मुख्यमंत्रीपदी होते. तर अडवाणी, मुरली मनोहर जोशी, वाजपेयी, प्रमोद महाजन, उमा भारती असे सारे नेते मशिदी जवळच्या मैदानात प्रचंड सभेत भाषणे करत होते.
बाबरी कोसळणे ही आजच्या मंदिर उभारणीची खरी सुरुवात होती असेही म्हणता येईल. दिल्लीत नरसिंह रावांचे सरकार तेव्हा होते. बाबरी पडली तेव्हा केंद्रीय फौजा अयोध्येतच होत्या. पण राव सरकारने त्यांना गोळीवार वा तत्सम आक्रमक कारवाई करण्यापासून रोखले होते. नंतर कल्याणसिंगाचे सरकार बरखास्त झाले.
भाजप व विहिंपने कारसेवा आंदोलनेनंतरही सुरुच ठेवली. मुंबई बाँबस्फोट व दंगलींनी देश हादरला, त्याहीपेक्षा मोठा धक्का देशाला गोध्राकांडाने बसला. २००३ मध्ये अयोध्येतून परत गुजरातेत येणाऱ्या कारसेवकांच्या रेल्वे गाडीला गोध्रा येथे अडवून पेटवून देण्यात आले. त्यानंतर गुजरातमध्ये मोठा भडका उडाला. अनेक मुस्लीम कुटुंबांवर हल्ले झाले, हत्या झाल्या. तो सरा भयंकर घटनाक्रम घडला तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे होते. तेव्हापासून सोनिया गांधींसारखे काँग्रेस नेते मोदींचा उल्लेख ‘मौत के सौदागर’ असाच करत राहिले.
विवादास्पद ढांचा असे वर्णन केलेल्या बाबरी परिसराला केंद्र सरकाचे कुलूप लागले. पुढची ३० वर्षे राम मंदीर हे भाजपच्या प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात चमकत होते, पण प्रकरण न्यायालयात सुरु होते. अखेरीस २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने बाबरीच्या दशकानुदशके सुरु असणाऱ्या सर्व प्रकरणांचा एकत्रित निकाल लावला आणि विवादास्पद ढांचा जिथे होता ती सारी जमीन, मंदीर उभे करण्यासाठी हिंदू पक्षकारांना दिली.
केंद्र सरकारने ट्रस्ट स्थापन करून मंदीर नीट उभे राहील हे पहावे, असेही आदेश होते. त्याचा सहाजिकच फायदा घेत चाणाक्ष मोदींनी चपळपणाने घेतला. तत्काळ ट्रस्ट स्थापन केला व मंदिराची उभारणी वेगाने पूर्णही केली. पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी मंदिराचे लोकार्पण करण्याचे जे ध्येय्य मोदींनी समोर ठेवले, तिथपर्यंत ते पोचलेही. मोदींसाठी सोमनाथहून सुरु झालेली यात्रा अयोध्येत पोहोचेपर्यंत, गुजरातच्या मुख्यमंत्री पदापासून भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत व देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचे महत्वपूर्ण मुक्काम आले आहेत. आज त्यांच्या त्या यात्रेची यशस्वी सांगता होत असताना मोदी व भाजप सलग तिसऱ्या वेळेचे सरकार केंद्रात स्थापन करण्याच्या तयाऱ्या करत आहेत देशाच्या राजकारणातील रामाचे स्थान जही असे अबाधित राहिले आहे.
– अनिकेत जोशी