बुलढाणा : लोकसभा निवडणूक आल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आहे. अनेक राजकीय समीकरणे समोर येत उमेवारी अर्ज भरले जात आहेत. दरम्यान, बुलढाण्याची निवडणूक देखील रंगली आहे. अपक्ष नेते म्हणून रविकांत तुपकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शेतकऱ्यांचा नेता म्हणून रविकांत तुपकर यांनी निवडणूकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी पक्षापुढे आव्हान उभे करत तुपकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
शेतकऱ्याचं लेकरू आपल्याला संसदेत पाठवयाचे आहे
बुलढाणा मतदार संघामध्ये रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. याआधी तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी निगडित होते. मात्र पक्षातील अंतर्गत कलह आणि काम करण्याची पद्धत त्यांना न रुचल्यामुळे रविकांत तुपकर पक्षातून बाहेर पडले. बुलढाणा मतदार संघातून अर्ज भरल्यानंतर रविकांत तुपकर म्हणाले, “मी आज उमेदवारी अर्ज भरत आहे. मी एकटा उमेदवार नसून जिल्ह्यातील सगळ्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून अर्ज भरत आहे. विजय हा सामान्य माणसाचा होणार आहे. त्यांच्या नाराजीचा फायदा आम्हाला होणार आहे. शेतकऱ्याचं लेकरू आपल्याला संसदेत पाठवयाचे आहे. लोक माझ्यावर खूप प्रेम करत आहेत,” असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.
विद्यमान खासदारांनी वाट लावण्याचे काम केले
त्याचबरोबर सलग तीन टर्म खासदार असलेले शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना बुलढाण्यामधून चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आलीय. महायुतीकडून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रविकांत तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आत्तापर्यंत कोणताही विकास केलेला नाही असा आरोप देखील तुपकर यांनी केला आहे. अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर म्हणाले, “जिल्ह्यातील विद्यमान खासदारांनी वाट लावण्याचे काम केले आहे. नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, लोक अस्वस्थ आहेत, परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये लोक आहेत. खासदार मोठे राजकारणी आहेत, सगळे नेते त्यांच्या बाजूने आहेत, सत्ता त्यांच्या बाजूने आहे. पण, आमच्या बाजूने गावातील लोक, शहरातील सामान्य माणसं आहेत,” असा घणाघात रविकांत तुपकर यांनी केला आहे.