सातारा : सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयात मध्यवर्ती प्रयोगशाळा बांधकामाचा भूमिपूजन शुभारंभ आणि सातारा येथील शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचा पायाभरणी व कोनशीला अनावरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या दोन्ही समारंभास सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबूले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व इतर मान्यवर उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेच्या दुमजली इमारतीमध्ये अध्ययावत प्रयोगशाळा, म्युझियम, व्याख्यान कक्ष, डेमो रूम, विभाग प्रमुखांचे कार्यालय अंतर्भुत आहे. सातारा शासकीय महाविद्यालय सुरु करणेसंदर्भाने माझा नेहमीच पाठपुरावा सुरु होता. महाविद्यालय सुरु होणे संदर्भातील एकएक टप्पा पार झाला असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली झाल्याचे मनस्वी समाधान वाटत आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या आणि प्रयत्न करणाऱ्या अजित पवार यांच्यासह सर्वांचेच मी आभार मानतो, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.