मूल न झाल्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का, काय आहे तथ्य (फोटो सौजन्य - iStock)
डॉ. मिताली यांना स्वतःला अशा टिप्पण्यांचा सामना करावा लागला आहे. Instagram वर एका व्हिडिओमध्ये, त्यांनी ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या घटकांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. वयाच्या ३५ वर्षांपर्यंत मूल न झाल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका खरोखरच वाढतो का, हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. या लेखातून त्याची सत्यता नेमकी काय आहे ते आपण पडताळून घेऊया
‘जर तुम्हाला मुले झाली नाहीत, तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर नक्कीच होईल?’ डॉ. मिताली यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, ‘जर तू ३५ वर्षांची आहेस आणि तुला मुले झाली नाहीत, तर तुला ब्रेस्ट कॅन्सर नक्कीच होईल,’अशा टोमण्यांना त्यांना अनेकदा सामोरे जावे लागले आहे. पण महिलांनी अशा टोमण्यांनी घाबरवणे थांबवलं पाहिजे असंही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलंय.
त्या पुढे सांगतात की, मूल न झाल्यामुळे महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका किंचित वाढू शकतो. पण अशा पद्धतीने विचार करणं योग्य नाही. कारण ही काही निश्चित गोष्ट नाही. स्तन कर्करोगाचा धोका तुमच्या वयावर, तुमच्या आईला, आत्याला किंवा आजीला तो झाला होता का यावर आणि कौटुंबिक इतिहासावर अवलंबून असतो. त्याचा आणि मूल न होण्याचा संबंध तुम्ही लाऊ शकत नाही.
याव्यतिरिक्त, BRCA1, BRCA2 हे जनुकीय उत्परिवर्तन किंवा तुम्हाला पूर्वी स्तनाचा आजार झाला होता का, याचाही स्तन कर्करोगाच्या धोक्यावर परिणाम होऊ शकतो. मद्यपान, लठ्ठपणा आणि इतर अनेक हार्मोनल व प्रजनन घटक देखील धोक्यावर परिणाम करू शकतात.
अपत्यप्राप्ती हा त्यावर प्रतिबंधात्मक उपाय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तज्ज्ञ असा निष्कर्ष काढतात की, अपत्यप्राप्ती हा स्तन कर्करोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय नाही. त्यामुळे, लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि इतरांनाही योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे. याबाबत अधिक जागरुकता व्हायला हवी असंही त्यांचं म्हणणं आहे. केवळ मूल नाही म्हणून स्तनाचा कर्करोग होतो ही मानसिकता कोणत्याही पद्धतीने योग्य नाही हेच यातून त्यांनी लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.






