
800000000 लोकांची किडनी झालीये खराब.... शरीर ओरडून ओरडून देत असते 'हे' संकेत, वेळीच नाही ओळखले तर मृत्यू अटळ!
अहवालात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, बहुतेक रुग्ण हे CKD च्या पहिल्या ते तिसऱ्या टप्प्यात आहेत. यात असेही सांगण्यात आले की, बहुतेक किडनी डॅमेज रुग्णांना ही समस्या पहिल्या स्टेजमध्ये ओळखता येत नाही ज्यामुळे ते समजेपर्यंत ते शेवटच्या स्टेजला पोहचलेले असतात. २०२३ मध्ये, CKD हे जगभरातील मृत्यूचे नववे प्रमुख कारण होते, ज्यामुळे अंदाजे १.४८ दशलक्ष मृत्यू होतात. आपली किडनी आपल्या शरीरातील मूलभूत अवयव आहे त्याने कार्य करणे बंद केले तर आपल्याला थकवा, सूज आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. किडनीचा आजार पहिल्या स्टेजमध्ये ओळखण्यासाठी काय करावं आणि हा आजार कसा रोखायचा ते चला जाणून घेऊया.
कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत?
अहवालानुसार, चीन (१५२ दशलक्ष) आणि भारतात (१३८ दशलक्ष) सीकेडी रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. शिवाय, अमेरिका, इंडोनेशिया, जपान, ब्राझील, रशिया, मेक्सिको, नायजेरिया, पाकिस्तान, बांगलादेश, इराण, फिलीपिन्स, व्हिएतनाम, थायलंड आणि तुर्कीमध्येही १ कोटींहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत.
किडनी खराब होण्याची कारणे?
अहवालात सांगितल्याप्रमाणे, किडनी डॅमेजचे मुख्य कारण हाय ब्लड शुगर, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि खूप जास्त किंवा खूप कमी तापमानाचा संपर्क हे असू शकते. संशोधनात असेही आढळून आले की २० ते ६९ वयोगटातील दर दहा वर्षांनी किडनीच्या आजाराचा धोका वाढतो.
सीकेडी म्हणजे काय?
सीकेडी (CKD) म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज (Chronic Kidney Disease), हा एक असा आजार आहे ज्यामध्ये किडनीचे कार्य हळूहळू आणि दीर्घकाळासाठी कमी होऊ लागते. किडनी योग्यरित्या आपल्या शरीरातील रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी गाळण्याचे काम करत नाही. यामुळे आपल्या शरीरात हानिकारक पदार्थांची वाढ होऊ लागते. यामुळे हृदयरोगासारख्या इतर गंभीर समस्यांचा धोका वाढतो. सुरुवातीला अनेकांना याची साैम्य लक्षणे ध्यानात येत नाहीत पण पुढे याचा त्रास वाढत जातो.
सीकेडीची सुरुवातीच्या लक्षणे
सीकेडीची सर्वात मोठी समस्या म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. पण आजार वाढायला लागताच शरीरात काही बदल घडून येतात ज्यात काही लक्षणांचा समावेश होऊ शकतो. जसे की, काहीही न करता थकवा लागणे, भूक न लागणे, मळमळणे, उलट्या होणे, घोट्यामध्ये सूज येणे आणि रात्री वारंवार लघवीला जाणे.
सीकेडी कसा रोखायचा?
जर तुम्हाला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्ही किडनीची नियमित तपासणी करायला हवी. यामुळे कोणता आजार जडल्यास तुम्हाला त्याची वेळेत माहिती मिळेल. तुमच्या आहारात मीठ आणि साखर,जंक फूड आणि तळलेले पदार्थ यांचे सेवन कमी करा. दररोज थोडा व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ताण कमी करा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही गोळ्यांचे सेवन करु नका. तुमच्या रक्तातील साखर आणि रक्तदाब नेहमी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.