मायोपिया म्हणजे काय (फोटो सौजन्य - iStock)
मायोपिया किंवा निकटदृष्टिदोष ही हल्लीच्या काळात सर्रास आढळून येणारी डोळ्यांची समस्या आहे, खासकरून मुले, टीनएजर्स आणि युवकांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. भरीस भर म्हणून मायोपियाविषयीचे गैरसमज आणि सामाजिक कलंक समस्येतील गुंतागुंत वाढवतात. आमचे मिशन मायोपियावर उपचार करणे, त्याबरोबरीनेच लोकांना स्पष्ट आणि अचूक माहिती पुरवणे हेदेखील आहे. मायोपियाविषयीचे सामान्य गैरसमज कोणते ते समजून घेऊ आणि त्यामागचे सत्य उजेडात आणू या. डॉ. विकास जैन, ग्रुप सीओओ, ASG आय हॉस्पिटल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
गैरसमज १: मायोपिया हा एक आजार आहे
सत्य: मायोपिया हा आजार नाही, ही डोळ्यांमध्ये निर्माण होणारी एक सामान्य अपवर्तक त्रुटी आहे. डोळ्याच्या आकारामुळे प्रकाश डोळयातील पडद्यासमोर केंद्रित होतो, ज्यामुळे दूरच्या वस्तू अस्पष्ट, धूसर दिसतात. भारतातील सुमारे ३०-४०% प्रौढांमध्ये ही स्थिती असते. चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स किंवा LASIK आणि Phakic IOLs सारख्या प्रक्रियांनी ते सहजपणे दुरुस्त केले जाऊ शकते. मायोपिया खूप जास्त असेल तर गुंतागुंत होण्याचा धोका किंचित वाढू शकतो, परंतु डोळ्यांची तपासणी नियमितपणे केली जात असेल तर ही स्थिती नियंत्रणात ठेवता येते.
उन्हाळ्यात डोळे देखील सांभाळा ! योग्य काळजी न घेतल्या वाढेल इन्फेक्शनचा धोका
गैरसमज २: मायोपिया जास्त म्हणजे त्या व्यक्तीशी लग्न करू नये किंवा त्या व्यक्तीने मुले होऊ देऊ नयेत
सत्य: याला कोणताही वैद्यकीय आधार नाही. हाय मायोपिया (-६.०० डायऑप्टर्सपेक्षा जास्त) नेत्रपटलाच्या समस्यांचा धोका किंचित वाढवू शकतो, परंतु त्याचा प्रजनन क्षमता, विवाह किंवा पालकत्वावर काहीही परिणाम होत नाही. मायोपिया असलेल्या पालकांच्या मुलांना मायोपिया होण्याची शक्यता जास्त असते (२-३ पट जास्त), परंतु अगदी लहानपणापासून नियमितपणे डोळ्यांची तपासणी, दररोज २ तासांपेक्षा बाहेर, मोकळ्या वातावरणात घालवणे आणि डोळ्यांची योग्य काळजी घेणे, असे साधेसोपे उपाय करून मायोपिया टाळता येतो किंवा त्याला विलंब करता येतो.
गैरसमज ३: चष्मा घातल्याने मायोपिया अधिक गंभीर होतो
सत्य: हे खोटे आहे. चष्मा रेटिनावर योग्यरित्या प्रकाश केंद्रित करून दृष्टी सुधारतो – तो मायोपिया खराब करत नाही. चष्मा टाळल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो, दृष्टी अंधुक होऊ शकते, अँब्लियोपिया होऊ शकते किंवा मुलांमध्ये शाळेतील कामगिरी खराब होऊ शकते. योग्य, नियमितपणे तपासणी करून, अपडेट केलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार चष्मा वापरल्यास आरामदायी, कार्यक्षम दृष्टी मिळते.
गैरसमज ४: मायोपिया नेहमीच वयानुसार वाढत जातो
सत्य: बहुतेक व्यक्तींमध्ये, मायोपिया बालपणात वाढतो आणि विशीच्या सुरुवातीला स्थिर होतो. प्रौढावस्थेत (विशेषतः हाय मायोपिया किंवा जास्त स्क्रीन टाइमसह) कधीकधी ही स्थिती वाढू शकते, परंतु मुलांसाठी दररोज २ पेक्षा जास्त तास बाहेर घालवणे, स्क्रीन टाइम मर्यादित करणे आणि अभ्यासादरम्यान आणि कामातून वारंवार ब्रेक घेणे यासारख्या सवयी मायोपियाची प्रगती कमी करण्यास मदत करू शकतात. मायोपिया नियंत्रण लेन्सचा वापर देखील मायोपियाची प्रगती कमी करण्यास मदत करू शकतो.
तुमचेही डोळे सतत फडफडत आहेत का? शुभ-अशुभ सोडा, यामागे असू शकते ‘हे’ गंभीर कारण
गैरसमज ५: लेसर शस्त्रक्रिया धोकादायक किंवा असुरक्षित आहे
सत्य: LASIK किंवा SMILE सारख्या लेसर शस्त्रक्रिया बहुतेक व्यक्तींसाठी सुरक्षित आणि प्रभावी ठरतात, ज्यामध्ये ९५% पेक्षा जास्त सुधारित दृष्टी प्राप्त होते. या प्रक्रिया कॉर्नियाला आकार देतात, बहुतेकदा चष्म्याची आवश्यकता कमी करतात किंवा काढून टाकतात. डोळे कोरडे पडणे यासारखी दुर्मिळ गुंतागुंत नेत्रतज्ज्ञांकडून शस्त्रक्रियापूर्व तपासणी करून कमी केली जाऊ शकते.
गैरसमज ६: मायोपिया नियंत्रण चष्मा हे फक्त एक मार्केटिंग साधन आहे
सत्य: मायोपिया नियंत्रण चष्मा हे केवळ एक मार्केटिंग साधन नाही – ते मुलांमध्ये मायोपियाची प्रगती कमी करण्याच्या उद्देशाने आधुनिक क्लिनिकल संशोधनावर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्तीला यामधून मिळणारे परिणाम वेगवेगळे असू शकतात परंतु एकंदरीत पाहता आशादायक परिणाम दर्शविले आहेत, मायोपिया नियंत्रण चष्मा मुलांमध्ये मायोपियाची प्रगती कमी करण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेले आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की हे लेन्स डोळ्यांमध्ये प्रकाश कसा केंद्रित होतो त्यामध्ये बदल घडवून आणून मायोपियाची प्रगती मानक चष्म्यांच्या तुलनेत ५०-६०% पर्यंत कमी करू शकतात. हा केवळ एक उपचार नाही. जेव्हा डोळ्यांची देखभाल करणारे डॉक्टर ते सुचवतात आणि चष्म्याच्या बरोबरीने जीवनशैलीमध्ये इतर बदल देखील घडवून आणले जातात, तेव्हा ते मुलांमध्ये मायोपिया व्यवस्थापित करण्यासाठी एक शक्तिशाली साधन ठरू शकते.
काय आहे निष्कर्ष
मायोपिया ही डोळ्यांची एक स्थिती आहे. त्याचे व्यवस्थापन केले जाऊ शकते आणि त्यामुळे जीवन उत्साहामध्ये काहीही अडथळा येत नाही. तुमचे करिअर असो किंवा नातेसंबंध, स्वप्ने पूर्ण करणे असो, काहीही मायोपियामुळे थांबून राहू शकत नाही. खरे आव्हान आहे मायोपियाविषयीचे गैरसमज आणि सामाजिक कलंक. अचूक माहिती, डोळ्यांची नियमितपणे तपासणी, मोकळ्या हवेत, खुल्या वातावरणात वावरणे आणि मायोपिया नियंत्रण चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स किंवा शस्त्रक्रिया यासारख्या उपायांनी, तुम्ही स्पष्ट दृष्टी आणि आत्मविश्वास दोन्ही मिळवू शकता. चला, मायोपियाभोवतीचे धुके दूर सारू या आणि स्पष्टपणे जग बघू या, जीवनाचा आनंद घेऊ या!