केसांमध्ये सतत गुंता होतो? मग 'या' पद्धतीने कढीपत्त्याच्या पानांचा वापर करून बनवा अँटी-हेअरफॉल स्प्रे
वातावरणात होणारे बदल, जंक फूडचे सेवन, धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. ज्यामुळे काहीवेळा खूप जास्त केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा इत्यादी केसांच्या समस्या उद्भवू लागतात. लांबलचक सुंदर आणि मुलायम केस महिलांच्या सौंदर्यात कायमच भर पडतात. केस सुंदर आणि चमकदार दिसावे म्हणून अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी हेअरमास्क लावून केसांची काळजी घेतली जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त शँम्पूचा वापर केस स्वच्छ करण्यासाठी केला जातो.(फोटो सौजन्य – istock)
केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. वारंवार केस गळून टक्कल पडेल की काय अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण होते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट करून घेतात. पण हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळच केस सुंदर दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. केसांमध्ये कंगवा घातल्यानंतर केस गुंतून जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वारंवार होणारी केस गळती थांबवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा हेअर स्प्रे बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याचे सेवन नियमित केल्यास महिनाभरात फरक दिसून येईल.
पोषक घटकांनी समृद्ध असलेला कढीपत्ता स्वयंपाक घरातील सर्वच पदार्थ बनवताना वापरला जातो.कढीपत्त्याची फोडणी जेवणाला दिल्यास पदार्थांची चव आणि सुगंध वाढतो. वारंवार होणाऱ्या केस गळतीपासून आराम मिळवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. याशिवाय कढीपत्त्याच्या पानांपासून बनवलेला हेअर स्प्रे सुद्धा तुम्ही वापरू शकता. हा हेअर स्प्रे नियमित केसांसाठी वापरल्यास केसांना नैसर्गिक चमक येते आणि केस अतिशय सुंदर दिसतात. नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस अतिशय सुंदर, चमकदार दिसतात. केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर करावा.
हेअर स्प्रे बनवताना सर्वप्रथम, कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड करून घ्या. पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यात कोरफड जेल, इसेंशियल ऑईल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून केसांवर नियमित एक किंवा दोन वेळा स्प्रे करा. यामुळे केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळेल.