हाडांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात या भाज्यांचे करा सेवन
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हाडांच्या वेदना वाढू लागतात. हाडांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. मात्र कमी वयात सतत डॉक्टरांच्या गोळ्या औषध घेण्याऐवजी आहारात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. जीवनशैलीत झालेला बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, कामाचा वाढलेले ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. धावपळीच्या जीवनशैलीमुळे हाडांचे दुखणे, संधिवात, सांध्यांचे दुखणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
भेंडीच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. मात्र या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम आढळून येते. आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि हाडांच्या वेदना थांबतात. याशिवाय भेंडीच्या भाजीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे आढळून येतात. मजबूत हाडांसाठी आहारात भेंडीच्या भाजीचे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेवन करावे. यामुळे शरीरात कॅल्शियम वाढते. हाडांची घनता सुधारण्यासाठी नियमित भेंडीच्या भाजी खावी.
ब्रोकोली भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम आढळून येते. याशिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात तुम्ही ब्रोकोलीचे सेवन करू शकता. ब्रोकोलीपासून तुम्ही सूप, भाजी, सॅलड इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता. यामध्ये कॅल्शियम, विटामिन के, अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येते . हाडांमधील कमजोरी दूर करण्यासाठी आहारात ब्रोकोलीचे सेवन करावे.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पालक भाजी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्यास कॅल्शियमची कमतरता दूर होते. याशिवाय पालकमध्ये कॅल्शियम, लोह आणि इतर जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी दैनंदिन आहारात पालकचे नियमित सेवन करावे. पालकपासून पालक पनीर, पालक स्मूदी, पालक भजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात.
सर्वच ऋतूंमध्ये बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. गाजरचे सेवन केल्यामुळे शरीराला कॅल्शियम मिळते. याशिवाय डोळ्यांची कमी झालेली दृष्टी सुधारण्यास मदत होते. हाडांचे वाढलेले दुखणे कमी करण्यासाठी रोजच्या आहारात गाजर, बीट, काकडी या गुणकारी पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरातील कमी झालेली लोहाची आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघते. गाजरमधील अँटिऑक्सिडंट्स सांधेदुखी आणि सांध्यांमधील जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात.