डोळ्यांखालील काळी वर्तुळे असू शकतात या आजारांचे लक्षण
प्रत्येकाला सौंदर्याची आवड असते, आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशात त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. मुरुमे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे यांसारख्या समस्या जणू आता सामान्यच झाल्या आहेत. अनेक महिलांना तसेच पुरुषांना त्वचेच्या या समस्या आहेतच. डोळ्यांखाली काळी वर्तुळे बहुतेकदा झोपेचा अभाव आणि थकवा यांच्याशी संबंधित असतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का की याशिवाय, काही आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे देखील काळी वर्तुळे येऊ शकतात.
हे खरं आहे, तुमच्या डोळ्यांखाली दिसणारी काळी वर्तुळे ही एखाद्या वैद्यकीय समस्येचे लक्षण असू शकते. अनेकदा आपण यामागे झोपेचा अभाव आणि थकवा यांना कारणीभूत ठरवतो मात्र असे नाही, आम्ही तुम्हाला सांगतो की, झोपेव्यतिरिक्त, काही इतर समस्यांमुळे देखील आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याची कारणे आणि त्यामागील संभाव्य आजार याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
उन्हात अधिक वेळ घालवणे
मेडिकल न्यूज टुडेच्या एका अहवालानुसार, सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामुळे काळी वर्तुळे होऊ शकतात. खरं तर, जास्त सूर्यप्रकाशामुळे जास्त प्रमाणात मेलेनिन तयार होऊ शकते, ज्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागतात.
ॲनीमिया
लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण यामुळेही डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. अशक्तपणामुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे कमी ऑक्सिजनयुक्त रक्त डोळ्यांखालील नाजूक त्वचेपर्यंत पोहोचते. ज्यामुळे काळी वर्तुळे निर्माण होतात.
दारू आणि धूम्रपान
जास्त प्रमाणात धूम्रपान आणि मद्यपान करण्याची सवय देखील डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतात. हे शरीराला डिहायड्रेट करू शकतात किंवा थकवा आणू शकतात, ज्यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या निर्माण होऊ शकते.
थायरॉईड
याव्यतिरिक्त, थायरॉईड कंडिशन विशेषतः हायपोथायरॉईडीझम (अंडरअॅक्टिव्ह थायरॉईड), डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसण्यास कारणीभूत ठरू शकते. हायपोथायरॉईडीझममुळे डोळ्यांभोवती रक्तप्रवाह आणि मेलेनिनचे उत्पादन कमी होऊ शकते, ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होऊ शकतात.
जन्मजात हृदय असतं बाहेर! काय आहे Ectopia Cordis? हार्टची अनोखी रचना; जाणून घेऊया संपूर्ण माहिती
एलर्जी
परागज ज्वर संबंधित ऍलर्जी देखील काळी वर्तुळे निर्माण करू शकते. परागज ज्वर ज्याला हे फिव्हर (Hay Fever) असेही म्हटले जाते. यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊ शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.