डायरियामुळे शरीरात अशक्तपणा वाढला आहे? मग 'या' आयुर्वेदिक पेयाचे नियमित करा सेवन
राज्यभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे साथीचे आजार वाऱ्यासारखे पसरू लागले आहेत. पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे किंवा दूषित पाणी, अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते आणि आजार होतात. सर्दी, खोकला किंवा ताप आल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे शरीराच्या पेशी आणखीनच कमी होऊन इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. डेंग्यू, मलेरिया झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. तसेच पावसाळ्यात प्रामुख्याने उद्भवणारा आजार म्हणजे डायरिया. डायरिया झाल्यानंतर वारंवार जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यामुळे किंवा पावसाळ्यात बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे जुलाब, उलट्या किंवा मळमळ होण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात डायरिया होणे ही अतिशय सामान्य समस्या असली तरीसुद्धा बऱ्याचदा डायरियामुळे आरोग्य आणखीनच खराब होऊन जाते. यामुळे दिवसभरात व्यक्तीला ३ वेळांपेक्षा जास्त वेळ टॉयलेट जावे लागते. यामुळे शरीरातील पाणी पूर्णपणे कमी होते आणि बॉडी डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते. शरीरात थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. पोटात वेदना, मुरडा येणे, सतत टॉयलेटला जायला लागणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डायरियापासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
डायरिया झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील खाकी गोळीचे किंवा इतर गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र या गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करू शकता. या काढ्याच्या सेवनामुळे जुलाब थांबून शरीरातील थकवा आणि अशक्तपणा कमी होईल. आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी धणे, जिरं, सुंठ आणि खडीसाखर लागेल.
आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी घेऊन ते गरम करून घ्या त्यानंतर त्यात धणे, जिरे, खडीसाखर आणि सुंठ टाकून १० मिनिटं व्यवस्थित उकळवून घ्या. तयार केलेले पाणी गाळून घ्या आणि सेवन करा. यामुळे जुलाब थांबतील आणि शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. आतड्यांमध्ये वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे.
अतिसार म्हणजे काय?
अतिसार म्हणजे वारंवार पातळ किंवा पाण्यासारखे मल येणे. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता (dehydration) होऊ शकते.
अतिसारावर काय उपचार करावे?
अतिसारामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे भरपूर पाणी, ओआरएस (ORS) किंवा इतर पातळ पेये प्या. केळी, पांढरा तांदूळ, टोस्ट आणि सफरचंद यांसारखे पचनास सोपे अन्न खा.
अतिसारासाठी काही घरगुती उपचार काय आहेत?
आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे अतिसाराची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. पुदिना देखील अतिसारावर उपचार करण्यासाठी एक चांगला उपाय आहे.