
Dj Sound: डीजेच्या कर्कश आवाजाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
मोठ्या आवाजातील डीजेचा हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम:
हृदयाच्या आजाराची गंभीर लक्षणे:
लहान मुले, गर्भवती महिलांच्या शरीरावर होणारा परिणाम:
DJ Sound: सण समारंभ, गणपती उत्सव किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांमध्ये कायमच डीजे लावला जातो. डीजे आणि मोठ्या आवाजातील लाऊड स्पीकरशिवाय विर्सजन मिरवणुका अपुऱ्या वाटतात. पण मोठ्या आवाजात लावणाऱ्या डीजेमुळे हृदयाचे गंभीर नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. अतिशय तीव्र आणि कर्कश आवाजामुळे शरीरात स्ट्रेस रिस्पॉन्स वाढून हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी वेळासाठी वाढतो. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक, स्ट्रोक, उच्च रक्तदाब वाढून आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हृद्यासंबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या महिला किंवा पुरुषांनी मोठ्या आवाजातील डीजे समोर जाणे टाळावे. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर किंवा अचानक बेशुद्ध पडणे यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)
मोठ्या आवाजात लावणाऱ्या डीजेमुळे केवळ हृदयावरच नाहीतर मज्जासंस्था, रक्तदाब इत्यादी अनेक गोष्टींवर परिणाम होतो. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्यानंतर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. तर काहीवेळा अचानक हृदयाचे ठोके वाढतात आणि हृदय रक्त पंप करणे बंद करते, अशावेळी स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मोठ्या आवाजात लावणाऱ्या जाणाऱ्या डीजेसमोर जाणे टाळावे, अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
जास्त वेळ मोठ्या आवाजातील डीजेच्या सानिध्यात राहिल्यामुळे शरीरात तीव्र स्ट्रेस रिस्पॉन्स वाढतो. हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक वाढल्यामुळे शरीराची स्थिती बिघडून जाते. उच्च रक्तदाब आणि इसकेमिक हार्ट डिसीजचा धोका वाढू शकतो. डीजेच्या सिस्टीममधून निघणारा भारी बेस आवाज शरीराला आतून हादरवून टाकतो. या आवाजामुळे केवळ हार्टचा त्रास असलेल्या व्यक्तीचे नाहीतर निरोगी व्यक्तींचे सुद्धा हृदय बंद पडू शकते. तसेच कायमच मोठ्या आवाजाला दोष न देता हृदयविकार किंवा हृदयाच्या ठोक्यांचे बिघडलेले प्रमाण तपासणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
हृद्यासंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर छातीत दाब, घट्टपणा किंवा अस्वस्थता जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक विनाकारण भरपूर घाम येणे, मळमळणे, चक्कर येणे, असामान्य अशक्तपणा किंवा छातीतील वेदना डाव्या हाताकडे, पाठीत, मान किंवा नाडीपर्यंत पसरण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय काही मुलं अचानक बेशुद्ध पडतात आणि त्वचा किंवा ओठ निळसर पडणे आणि छातीत धडधड होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
मोठ्या आवाजाचा त्रास हृद्यासंबंधित आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींचं नाहीतर लहान मुले, गर्भवती महिला, वयोवृद्ध इत्यादी अनेकांमध्ये सुद्धा दिसून येतो. जन्मजात हृदयविकार किंवा हृदयाच्या ठोक्यांचे आजार असलेल्या मुलांना मोठ्या आवाजातील डीजेसमोर घेऊन जाणे टाळावे. यामुळे मुलांच्या शरीराला हानी पोहचू शकते. डीजेच्या आवाजामुळे कायमचा बहिरेपणा सुद्धा येतो.