
पुरुषांना Erectile Dysfunction मुळे होऊ शकतो डायबिटीस (फोटो सौजन्य - iStock)
इरेक्टाइल डिसफंक्शन ही फक्त लैंगिक समस्या नाही. ती शरीरात सुरू असलेल्या डायबिटीजचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. रक्तातील साखर वाढल्याने रक्तवाहिन्या आणि नसांचे नुकसान होते, ज्यामुळे इरेक्शन टिकत नाही. डायबिटीजमुळे शरीरातील नसांवर आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. ज्यामुळे लैंगिक उत्तेजना किंवा इरेक्शन राखण्यास अडचण येते. हाच परिणाम मूत्रविकार नियंत्रण, मूत्राशयाची कार्यक्षमता आणि मूत्रपिंडांच्या आरोग्यावरही होतो. ज्यामुळे पुरुषांच्या एकूण आरोग्यावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे.
रात्री कमी झोपणे पुरुषांसाठी ठरतेय घातक, Erectile Dysfunction सह 3 आजारांना पडाल बळी
काय सांगतात तज्ज्ञ
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. आदित्य देशपांडे म्हणाले की, “इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांना लैंगिक संबंधासाठी पुरेसे इरेक्शन मिळवणे किंवा टिकवणे कठीण जाते. काहींना लैंगिक इच्छेत घट, इरेक्शन कमी वेळ टिकणे, तसेच लैंगिक कार्याबद्दल चिंता आणि ताण जाणवू शकतो. अनेक पुरुष लाजेमुळे ही समस्या लपवतात, पण वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. डायबिटीज नियंत्रणात ठेवून, जीवनशैलीत सुधारणा करून आणि योग्य उपचार घेऊन इरेक्टाइल डिसफंक्शन मध्ये सुधारणा करता येते आणि गंभीर समस्या टाळता येतात.
अनेक वेळा इरेक्टाइल डिसफंक्शन हे डायबिटीजचे पहिले दिसणारे लक्षण असते. रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास रक्ताभिसरण कमी होते आणि लैंगिक कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सूक्ष्म नसांचे नुकसान होते. सतत इरेक्टाइल डिसफंक्शन जाणवत असल्यास पुरुषांनी ते दुर्लक्षित न करता डायबिटीजची तपासणी करावी. सुमारे २०% इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांना डायबिटीज असल्याचे आढळते. महिन्यात ३०-४५ वयोगटातील १० पैकी २ पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शन आणि डायबिटीजसह येतात. डायबिटीज लवकर ओळखून साखर नियंत्रणात ठेवली, तर मोठ्या गुंतागुंती टाळता येतात.”
अजिबात लाज बाळगू नये
डॉ. देशपांडे पुढे म्हणाले, “पुरुषांनी इरेक्टाइल डिसफंक्शन बद्दल डॉक्टरांशी बोलताना लाज बाळगू नये. वेळेत उपचार घेतल्याने आत्मविश्वास वाढतो आणि डायबिटीज लवकर ओळखता येतो. डायबिटीजची काही सामान्य लक्षणे म्हणजे जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा, वजन घटणे, जखमा हळूहळू बऱ्या होणे आणि दृष्टी धूसर होणे. डायबिटीजवर नियंत्रण न ठेवल्यास तो हृदयविकार, मूत्रपिंडाचे नुकसान, नसांचे बिघाड आणि लैंगिक समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी स्वतःहून औषधे घेणे योग्य नाही. कारण त्यामुळे मूळ कारणाचा उपचार लांबतो. त्याऐवजी पुरुषांनी आरोग्यदायी सवयी जोपासल्या पाहिजेत. जसे की, संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, धूम्रपान सोडावे आणि तणाव कमी करावा. या गोष्टी डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास आणि लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार, योग्य वजन राखणे, दररोज व्यायाम आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे.”
कोणत्या पुरुषांमध्ये होतो Erectile Dysfunction चा अधिक धोका? काय आहेत कारणे