
चैत्रापासून फाल्गुनापर्यंत... ! मराठी महिन्यांच्या नावांमागे दडलाय हजारो वर्षांचा इतिहास, जाणून घ्या सविस्तर
मराठी महिन्यांची नावं अशीच ठेवली गेली नाहीत. तुम्हाला इंग्रजी महिन्यांची नावं तोंडपाठ असतात पण मराठी महिन्यांची नावं पटकन तोंडावर येतात का? मराठी महिन्यांच्या प्रत्येक नावामागे आकाश, नक्षत्र आणि हजारो वर्षांची परंपरा आहे. नक्षत्र, ऋतुचक्र आणि परंपरेशी नेमकी बारा महिन्यांची गोष्ट कशी जोडली गेली आहे आज आपण व्हिडिओतून समजून घेऊया. (फोटो सौजन्य – AI)
चैत्र हा मराठी महिन्याचा पहिला महिना. नवचैतन्य, नवा महिना, वसंत ऋतुची चाहूल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमेला चंद्र हा चित्रा नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला चैत्र महिना म्हटलं जातं. याच महिन्यात गुढीपाडवा येतो आणि या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते. याशिवाय चैत्र नवरात्रही या दिवसापासून सुरू होते. रामनवमी, हनुमान जयंतीसारखे उत्सव या महिन्यातच येतात
पौर्णिमेला चंद्र हा विशाखा नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला वैशाख म्हटलं जातं. हा निसर्गातील परिपक्वतेचा काळ मानला जातो. तसंच उन्हाळ्याची चाहूल आणि पिकांची तयारी या महिन्यात सुरू होते. शेती आणि निसर्गाच्या बदलाची चाहूलदेखील याच महिन्यात लागते.
पौर्णिमेला चंद्र ज्येष्ठा नक्षत्राजवळ असतो म्हणून त्याला ज्येष्ठ महिना म्हणतात. हा सर्वाधिक उष्णतेचा काळ असून पावसाच्या प्रतिक्षेत हा महिना असतो. या महिन्यात वटपौर्णिमादेखील येते.
आषाढ महिन्यात पौर्णिमेला चंद्र हा पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रांच्या परिसरात असतो त्यामुळे याला आषाढ असं म्हटलं जातं. यावेळी पावसाची सुरूवात होत असून शेतीची पेरणी होते आणि हा महिना व्रत उपवासाचा आणि भक्तीला विशेष महत्त्व असणारा आहे.
पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्राच्या जवळ असल्याने श्रावण महिना नाव पडले आहे. यावेळी हिरवाईचा बहर असतो. समुद्र या काळात शांत होतो म्हणूनच या काळात नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. हा हिंदू संस्कृतीनुसार श्रद्धेचा महिना मानला जातो. नागपंचमी, रक्षाबंधन, श्रावणी सोमवार, शनिवार असे सर्व सण याच काळात येतात
गणपती बाप्पाचा महिना. पौर्णिमेला चंद्र पूर्वभाद्रपदा वा उत्तरभाद्रपदा नक्षत्रांच्या परिसरात असतो त्यामुळे याला भाद्रपद म्हणतात. या महिन्यात जितके महत्त्व गणेशोत्सवाला आहे तितकेच कृष्ण पक्षातील पितृपक्षालाही आहे
पौर्णिमेला चंद्र अश्विनी आणि भरणी नक्षत्रात असल्याने याला आश्विन महिना म्हटले जाते. नवरात्राची सुरूवात विजयादशमी अर्थात दसरा याच काळात साजरा केला जातो. चंद्रप्रकाशात लक्ष्मीचे पूजन करताना कोजागिरी पौर्णिमाही महत्त्वाची ठरते. शरद ऋतूची सुरूवातही याच काळात होते
पौर्णिमेला चंद्र विशाखा वा अनुराधा नक्षत्रात असून या काळात कार्तिक स्नान आणि दीपदानाला महत्त्व आहे आणि त्यामुळेच याला कार्तिक महिना असं म्हटलं जातं. कार्तिक शुद्ध एकादशीनंतर तुळशीच्या लग्नाचं महत्त्व आहे. दानधर्म विशेष असा हा महिना आहे
पौर्णिमेचे नक्षत्र हे आर्द्रा वा मृगशिरा नक्षत्राच्या जवळ असते म्हणून याला मार्गशीर्ष म्हणले जाते. जपासाठी हा काळ शुभ काळ मानला जातो
पुष्य नक्षत्राच्या जवळ पौर्णिमेचा चंद्र असल्याने याला पौष महिना म्हणतात. हवन, दान, तप आणि साधनेसाठी हा उत्तम महिना आहे.
मघा नक्षत्राच्या जवळ चंद्र असल्याने या मराठी महिन्याला माघ असे संबोधले जाते. अन्नदान, वस्त्रदान, तीळदान यांना शास्त्रात महान पुण्य असून यासाठी हा महिना ओळखला जातो.
मराठी महिन्याचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. पौर्णिमेला चंद्र पूर्वफाल्गुनी वा उत्तरफाल्गुनी नक्षत्रांच्या परिसरात असल्याने याला फाल्गुन महिना म्हणतात. होळी आणि रंगोत्सवाचा हा महिना मराठी महिन्यांचा शेवट ठरतो.
Ans: मराठी कालगणनेनुसार वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो.
Ans: मराठी पंचांगानुसार वर्षात एकूण १२ महिने असतात—चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन.
Ans: मराठी महिन्यांची नावं प्रामुख्याने चंद्राच्या नक्षत्रांशी संबंधित आहेत. पौर्णिमेच्या आसपास चंद्र ज्या नक्षत्राच्या जवळ असतो, त्या नक्षत्राच्या नावाशी संबंधित महिन्याचे नाव रूढ झाले.