
फोटो सौजन्य- pinterest
गौरी आगमनाच्या दिवशी मखराची सजावट करण्याला विशेष महत्त्व असते. यासाठी महागड्या सजावटीच्या वस्तूंची गरज नाही. घरात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू, फुले, कागद आणि दिव्यांचा वापर करून तुम्ही आकर्षक आणि पारंपरिक मखर तयार करू शकता. जाणून घेऊया काही सोप्या आणि सुंदर सजावटीच्या आयडिया.
दरवर्षी तीन दिवसांसाठी गौराई माहेरी येतात. यावेळी गौरी आवाहन, गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी गणपती विसर्जन असते. यावर्षी गौरी आवाहन गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी आहे. गुरुवारी गौरी आवाहनासाठी मुहू्र्त संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असेल. तर शुक्रवारी दिवसभरात कधीही गौरीची पूजा करू शकता. तसेच गौरी विसर्जनासाठी शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून २७ मिनिटे ते संध्याकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत वेळ आहे.
झेंडू, गुलाब आणि मोगऱ्याच्या फुलांनी मखर सजवा. फुलांचे तोरण किंवा माळा मखराच्या चौकटीला लावल्यास सजावट अधिक सुंदर दिसते.
आंब्याच्या पानांचे पारंपरिक तोरण मखराला लावा. फुलांसोबत हिरव्या पानांची सजावट केल्यास मखराला आकर्षक पारंपरिक लूक मिळतो.
रंगीत कागद, क्राफ्ट पेपर किंवा कार्डशीटपासून फुलं, पानं आणि विविध आकार तयार करून मखर सजवता येईल. ही सजावट कमी खर्चात करता येते.
घरात असलेली सुंदर साडी, दुपट्टा किंवा पारंपरिक कापड मखराच्या मागे लावा. पैठणी किंवा रेशमी कापडामुळे मखराला पारंपरिक आणि उठावदार रूप मिळू शकते.
मखराच्या आजूबाजूला छोट्या पणत्या किंवा एलईडी दिव्यांची माळ लावा. प्रकाशामुळे संपूर्ण सजावट अधिक खुलून दिसेल. दिवे लावताना सुरक्षिततेची काळजी घ्या.
मखराच्या समोर किंवा आजूबाजूला सुंदर पारंपरिक रांगोळी काढा. फुलांची रांगोळीही मखराला आकर्षक लूक देऊ शकते.
संपूर्ण सजावटीसाठी एक थीम निवडल्यास मखर अधिक नीटनेटके दिसते. फुलांची थीम, पारंपरिक महाराष्ट्राची थीम किंवा नैसर्गिक सजावट यापैकी एखादी कल्पना निवडू शकता.
मखरासाठी थर्माकोल किंवा महागड्या सजावटीच्या वस्तूंऐवजी कार्डबोर्ड, कागद, जुने कापड, फुले आणि घरातील उपलब्ध वस्तूंचा पुनर्वापर करता येतो.
गौरीच्या मखराची सजावट करताना खर्चापेक्षा कल्पकता आणि स्वच्छता महत्त्वाची आहे. साध्या साहित्याचा सुंदर वापर करूनही घरच्या घरी आकर्षक, पारंपरिक आणि मनमोहक मखर तयार करता येते.
मखराची सजावट करताना गौरीच्या मूर्तीपेक्षा सजावट जास्त उठून दिसणार नाही याची काळजी घ्या. मखर स्वच्छ, सुरक्षित आणि पूजेसाठी सोयीचे असावे. फुले आणि पाने वापरत असल्यास ती ताजी ठेवण्याचाही प्रयत्न करा.