केसांची होईल झपाट्याने वाढ! केसांच्या वाढीसाठी खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा कापूर
सर्वच महिलांना सुंदर आणि लांबलचक केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. केस सुंदर दिसावे म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर ट्रीटमेंट आणि हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण सतत हेअर ट्रीटमेंट केल्यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचण्याची शक्यता असते. सतत केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यास केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे किंवा केसांच्या समस्या उद्भवू लागतात. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बऱ्याचदा महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतात. पण तरीसुद्धा केसांच्या समस्या कमी होत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.खोबऱ्याच्या तेलात कापूर मिक्स करून लावल्यास केस अतिशय मुलायम आणि चमकदार होतात.(फोटो सौजन्य: Pinterest)
Homemade Hair Oil: पांढरे केस काळे करण्यासाठी ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, होतील काळेभोर सुंदर केस
केसांच्या वाढीसाठी वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन हलकेसे गरम करून घ्या. त्यानंतर त्यात २ किंवा ३ कापूरच्या वड्या टाकून रात्रभर तसेच ठेवून द्या. कापूरच्या वड्या मिक्स झाल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत सगळीकडे तेल लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज करून रात्रभर तेल केसांवर तसेच ठेवा. यामुळे कापूर तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहचेल. त्यानंतर केस शॅम्पूच्या सहाय्याने धुवून घ्या. आठवड्यातून तीनदा केसांना कापूर खोबऱ्याचे तेल लावावे.
साथीच्या आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमकुवत होऊन जाते. अशावेळी कापूरच्या तेलाने हलकासा मसाज करावा. यामुळे बंद झालेला श्वसनमार्ग खुला होण्यास मदत होईल. नाक बंद झाल्यानंतर कापूरच्या तेलाचा वापर करावा.
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, फोड, मोठे डाग घालवण्यासाठी कापूरच्या तेलाचा वापर करावा. याशिवाय कापूर सुद्धा त्वचेवर लावू शकता. त्वचेमध्ये वाढलेली जळजळ, खाज किंवा लहान जखमा बऱ्या करण्यासाठी कापूर तेल प्रभावी ठरते. खोबऱ्याच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचेमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी होतो.
कापूरच्या सुगंधामुळे मानसिक तणाव कमी होतो. अपुरी झोप, वारंवार होणारी डोकेदुखी किंवा मन शांत करण्यासाठी कापूरचा वापर करावा. शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे काहीवेळा झोपेची समस्या उद्भवते. अपुऱ्या झोपेमुळे कायमच थकवा आणि डोकेदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी कापूर तेल अतिशय प्रभावी ठरते.
केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी कापूर तेल संपूर्ण केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर तेल केसांवर लावून ठेवल्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होईल आणि केसांच्या समस्यांपासून आराम मिळेल.