अंघोळीसाठी साबण वापरत असाल तर थांबा! 'या' घरगुती पदार्थांचा वापर करून शरीर करा स्वच्छ
शरीर स्वच्छ करण्यासाठी सगळेच नियमित अंघोळ करतात. काहींना दिवसभरातून दोनदा अंघोळ करण्याची सवय असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरावर जास्त घाम येतो. ज्यामुळे काहीवेळा शरीर तेलकट आणि चिकट होते. त्वचा तेलकट किंवा चिकट झाल्यानंतर त्वचेवर बॅक्टरीया वाढू लागतात. त्यामुळे अंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. शरीर स्वच्छ केल्यानंतर सुद्धा काहीवेळा पुरळ, घामोळे किंवा डाग निघून जात नाही. अंघोळ करताना सगळेच साबणाचा वापर करतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे साबण उपलब्ध आहेत. त्यामुळे काही लोक त्वचेला सूट होईल असा साबण वापरतात, तर आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या साबणाचा वापर करतात.(फोटो सौजन्य – iStock)
अनेकदा प्रदूषण किंवा धूळ, मातीच्या जास्त सानिध्यात आल्यामुळे शरीरावरील त्वचा खराब होऊन जाते. यामुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याशिवाय बाजारात अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट, बॉडी स्पा इत्यादी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. या ट्रीटमेंट केल्यानंतर फारकाळ त्वचेवर ग्लो टिकून राहत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अंघोळ करताना साबणाचा वापर न करता कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत अगदी लहान मुलांपासून मोठ्यांना बेसन लावले जाते. बेसनाचा लेप किंवा फेसमास्क, फेसपॅक चेहऱ्यावर लावला जातो. यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होऊन चेहरा उजळदार आणि सुंदर होतो. याशिवाय बेसनाचा लेप शरीराला लावल्यास उष्णता कमी होऊन शरीर थंड होईल. यासाठी वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करून अंघोळ करताना शरीरावर लेप लावावा. ३ ते ४ मिनिटं ठेवून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यास शरीरावरील त्वचा अतिशय उजळदार दिसेल.
धार्मिक गोष्टींसाठी चंदनाचा वापर केला जातो. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय बाजारात मिळणाऱ्या अनेक साबणांमध्ये चंदन आढळून येते. साबणाऐवजी चंदनाचा लेप शरीरावर लावल्यास नैसर्गिकरित्या शरीर स्वच्छ होईल. चंदन शरीरावर लावल्यास घामाची दुर्गंधी पूर्णपणे नष्ट होईल.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले त्रिफळा चूर्ण अनेक गोष्टींसाठी वापरले जाते. बाजारात तुम्हाला त्रिफळा चूर्ण सहज उपलब्ध होईल. त्रिफळा चूर्ण त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे सकाळच्या वेळी अंघोळ करताना वाटीमध्ये त्रिफळा चूर्ण घेऊन त्यात पाणी मिक्स करून शरीराला लावू शकता. यामुळे शारीवरील डाग कमी होतील.