
'एआय'च्या मदतीने मेंदूविषयक आजारांचे निदान! केईएम रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प
Health Update: मुंबई महापालिकेच्या परळ येथील के.ई.एम. रुग्णालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि न्यूरोसायन्सच्या साहाय्याने अपस्मार (एपिलेप्सी) व मेंदूतील गाठी म्हणजेच ब्रेन ट्युमर यांसारख्या गंभीर मेंदूविषयक आजारांचे अचूक निदान आणि विश्लेषण करणारा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महापालिकेच्या ‘सोसायटी फॉर मुंबई इन्क्युबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप’ (स्माईल कौन्सिल) या बिझनेस इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून ही नवी वैद्यकीय प्रणाली विकसित केली जात असून, यासाठी सुमारे ४ कोटी ९९ लाख ९२ हजार ३३० रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.(फोटो सौजन्य – AI)
केईएम रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर हा अभ्यास केला जाईल. यामध्ये शल्यक्रियेपूर्वीची तपासणी आणि शल्यक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत होणारे बदल नोंदवण्यासाठी १ महिना, ३ महिने आणि ६ महिने अशा टप्यांवर पाठपुरावा केला जाणार आहे. १२ महिन्यांच्या कालावधीत १५० अपस्मार आणि १५० मेंदूतील गाठी अशा एकूण ३०० रुग्णांवर हा प्रायोगिक राबवण्याची शिफारस न्यूरोसर्जरी विभागप्रमुखांनी केली आहे.एआयच्या मदतीने गंभीर आजाराचे वेळीच निदान होऊन रुग्णावर उपचार करणे सोपे होणार आहे.
प्रकल्पाचा एकूण खर्च तीन टप्यांत विभागण्यात आला असून, उत्पादन व तपासणीसाठी २ कोटी ७० लाख ९८ हजार ७०० रुपये, प्रकल्प व्यवस्थापन खर्चासाठी ९ लाख ३६ हजार ३८० रुपये आणि अंमलबजावणी व क्षेत्रीय व्यवस्थापनासाठी ४६ लाख ६३ हजार ५०५ रुपये खर्च केले जातील.कर समाविष्ट करून ही एकूण रक्कम सुमारे ४.९९ कोटी रुपयांवर जाते. महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पातील ‘इनोव्हेशन इर्मप्लमेंटेशन फंड’मधून हा खर्च भागवला जाणार असून, व्यवसाय विकास विभागाच्या या प्रस्तावाला लवकरच स्थायी समितीची अंतिम मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.