फोटो सौजन्य - Social Media
रात्री उशिरा अभ्यास किंवा काम करताना अनेकदा भूक लागते. अशावेळी पोट भरायला चिप्स, नूडल्स किंवा पेस्ट्रीसारखे प्रोसेस्ड फूड पटकन खाल्ले जाते. मात्र, असे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट, सोडियम आणि साखर असते, ज्यामुळे पचन प्रक्रियेत अडथळा येतो आणि झोपेची गुणवत्ता खराब होते. त्याशिवाय, हे पदार्थ हळूहळू वजनवाढ, हृदयविकार आणि इतर आजारांना आमंत्रण देतात. त्यामुळे रात्री भूक लागल्यास फास्ट फूडऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरते. जर तुम्ही देखील रात्री उशिरा भूक लागल्याने असे असे प्रोसेस्ड ऍन खात असाल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहेत, याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
रात्री उशिरा भूल लागल्यास खाण्यासाठी काही हेल्दी पर्याय सहज उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, सुकामेवे जसे की बदाम आणि अक्रोड हे उत्तम पर्याय आहेत. यामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असल्याने शांत झोपेसाठी मदत मिळते. याशिवाय भाज्यांचे सूप, जसे की पालक किंवा दोडक्याचे सूप, कमी कॅलरीयुक्त आणि फायबरने भरलेले असते. त्यामुळे हे पचन प्रक्रियेसाठी फायदेशीर ठरते. जर तुम्हाला प्रोटीनयुक्त स्नॅक हवा असेल, तर पनीरसोबत खीरा किंवा अननस खाणे चांगले ठरते. खीऱ्याचे स्लाइस लिंबाचा रस आणि मीठ लावून खाल्ल्यास हलके आणि ताजेतवाने वाटते. जर गोड खाण्याची इच्छा असेल, तर डार्क चॉकलेटमध्ये बुडवलेली फ्रोजन केळी किंवा दालचिनी घालून बेक केलेले सफरचंद हा चवदार आणि आरोग्यदायी पर्याय ठरतो.
हे हेल्दी स्नॅक्स प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम यांसारख्या पोषक घटकांनी समृद्ध असतात. त्यामुळे पचन सुधारते, झोप चांगली लागते, आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते. तसेच, यामध्ये सोडियम, साखर आणि कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रित राहते. मात्र, लक्षात ठेवा की हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्ले जावेत, कारण जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो.
खाण्याच्या सवयींमध्ये फास्ट फूडचा समावेश केल्यास हळूहळू त्याची सवय लागते. सुरुवातीला “फक्त एक-दोन दिवस खाल्ले तर काही होणार नाही” असे वाटत असले तरी, ही सवय वजनवाढ, उच्च रक्तदाब आणि पचनाच्या समस्यांकडे नेऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या भुकेसाठी योग्य, आरोग्यदायी आणि पोषणमूल्य असलेले पर्याय निवडणे गरजेचे आहे. लेट नाईट स्नॅक्सची ही आरोग्यदायी सवय तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवेल.