
स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळात जवळच्या माणसांचा पाठिंबा गरजेचा
वयाच्या ४५व्या वर्षी शालिनीला वाटले होते की, स्तनाचा कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तिला केमोथेरपीच्या आव्हानात्मक प्रवासामधून जावे लागेल. पण, ट्यूमर काढल्यानंतर आणि केमोथेरपी संपल्यानंतर काही महिन्यांनी तिच्या मनात रात्रभर ‘हा आजार पुन्हा झाला तर?’ हा एकच विचार यायचा. तिच्या डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले होते की, तिच्या कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले आहे आणि पुढील उपचारांमुळे तो पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल. तरीही, ती त्या विचाराने अस्वस्थ होती. अशा वेळी तिला केवळ वैद्यकीय आश्वासनानेच सावरले नाही, तर तिच्या मुलीने तिच्या फोनवर औषधांचे डेली रिमाइंडर्स लावून देणे, तिच्या पतीने प्रत्येक फॉलो-अप व्हिजिटला तिच्यासोबत असणे आणि प्रत्येक क्लिअर स्कॅनला संपूर्ण कुटुंबाने आपला सामूहिक विजय मानून साजरा करणे, या गोष्टींनी तिला आधार दिला. कुटुंबाच्या या छोट्या पण प्रेमळ कृतींमधून शालिनीला पुन्हा एकदा मनसोक्त जगण्यासाठी बळ मिळाले.(फोटो सौजन्य – istock)
आजच्या काळात सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग अधिकाधिक उपचार करण्यायोग्य झाला आहे. वेळेवर निदान आणि विकसित होत असलेल्या उपचारपद्धतींमुळे परिणाम सुधारत आहेत. पण, हा प्रवास शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपीवर संपत नाही. आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता मनावर दडपण आणू शकते आणि हा धोका कमी करण्यासाठी पुढील उपचार काही महिने किंवा वर्षांनुवर्षे सुरू राहू शकतात. या काळात, वैद्यकीय टप्प्यांइतकेच रुग्णाचा जीवनाचा दर्जा, शारीरिक ऊर्जा, भावनिक स्थिरता आणि दैनंदिन दिनचर्या महत्त्वाची ठरते. यामध्ये प्रियजनांची भूमिका महत्त्वाची ठरते.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जेहान बी. दाभर म्हणाले, ”सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा एक सामान्य समज आहे. पण, प्रत्यक्षात आजाराचे लवकर निदान झाले तरी तो पुन्हा उद्भवण्याचा धोका असतो, जी शक्यता कधी-कधी ५० टक्क्यांपर्यंत असू शकते. त्यामुळे, आमचा ट्यूमरवर उपचार करण्यासह आजार पुन्हा उद्भवण्याचा धोका जास्तीत-जास्त कमी करण्याचा मनसुबा आहे. प्रगत लक्ष्यित उपचारपद्धतींमुळे पात्र रुग्णांमध्ये हे साध्य करण्याची आमची क्षमता लक्षणीयरित्या सुधारली आहे. यामुळे अनेक महिलांना त्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्या आणि दीर्घकालीन आरोग्य जपण्यास मदत होते. कुटुंबाला या सातत्यपूर्ण उपचारांचा उद्देश समजतो, तेव्हा ते रुग्णाचे उपचार पूर्ण करण्यात आणि त्यांची मानसिक शक्ती टिकवून ठेवण्यात प्रबळ सहयोगी बनतात.”
सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलेला पाठिंबा देण्यासोबत सतत माहितीपूर्ण व सहानुभूतीपूर्ण उपस्थिती असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांना त्यांच्या सुरूवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग प्रवासात खालील ४ प्रकारे आधार देऊ शकता:
सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगासह निदान झालेल्या महिलांसाठी हार्मोन-आधारित औषधे आणि लक्ष्यित उपचारपद्धती यांसारखे प्रगत उपचार जीवनाचा दर्जा उत्तम राखून आजार पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी करू शकतात. ट्यूमर काढून टाकल्यानंतर देखील अतिरिक्त उपचारांची शिफारस का केली जाते, हे समजून घ्या. डॉक्टरांच्या भेटींमध्ये सक्रियपणे सहभागी व्हा, तपासणीला सोबत जा, मनात असलेले प्रश्न आधीच लिहून ठेवा आणि शंकांवर मोकळेपणाने चर्चा करा. तुम्ही एकत्रितपणे माहिती जाणून घेता तेव्हा निर्णय घेणे हा एकट्यावरचा भार न वाटता एकत्रित निर्णय घेतल्याचे समाधान मिळते आणि उपचारांचे पालन करण्याची जिद्द अधिक वाढते.
आजार पुन्हा होण्याची भीती कधीही अचानक उद्भवू शकते. कदाचित स्कॅनिंगच्या आधी, शरीरात कुठे तरी थोडे दुखू लागल्यास किंवा एखाद्या आनंदाच्या दिवशी देखील ही भिती वाटू शकते. अशा वेळी त्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांना धीर द्या. ”मी तुझ्यासोबत आहे, तुला नेमकं काय वाटतंय ते मला सांग,’ यांसारखे साधे शब्द त्यांचे भावनिक एकाकीपण दूर करू शकतात. त्यांच्या मनातील भीती व्यक्त करण्यासाठी मोकळ्या मनाने चर्चा केल्याने त्यांचा विश्वास वाढतो आणि मनातील अस्वस्थता कमी होते.
आजारातून बरे होणे ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून अत्यंत वैयक्तिक बाब आहे. संतुलित आहार राखण्यास मदत करा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शारीरिक हालचालींसाठी प्रेरित करा आणि पुरेशी विश्रांती मिळेल याची काळजी घ्या. गरज भासल्यास औषधांच्या वेळांचे रिमाइंडर करण्याची जबाबदारी स्वत: घ्या. आनंदमय जीवन सामान्य वाटेल असे छोटे-छोटे क्रियाकलाप आखत राहा. शारीरिक ऊर्जा, सकारात्मकता आणि रोजच्या दिनचर्येवर लक्ष केंद्रित केल्यामुळे उपचार हे जीवनाला थांबवणारे न वाटता जीवनाला आधार देणारे वाटू लागतात.
उपचाराचे एक चक्र पूर्ण होणे, स्थिती स्थिर असण्याबाबत स्कॅन रिपोर्ट येणे, लॅबमधील चाचण्यांमधून स्थिती उत्तम असण्याचे समजणे किंवा अगदी आठवडाभर स्वतःमध्ये शक्ती जाणवणे यांतील प्रत्येक गोष्टीचे कौतुक करा. अशा यशाच्या टप्प्यांवर छोटेसे सेलिब्रेशन करा; मग ते एखादे आवडीचे जेवण असो, फॅमिली फोटो काढणे असो किंवा कृतज्ञतेचे काही शांत क्षण असोत. हे छोटे उत्सव तुमचे लक्ष आजार पुन्हा उद्भवण्याची भिती दूर करून तुमच्या सामूहिक जिद्दीकडे वळवण्यास साह्यभूत ठरतात.
डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?
सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोगावरील उपचार वैद्यकीय निदानापासून सुरू झालेली प्रक्रिया असली, तरी आजार पुन्हा उद्भवण्याच्या जोखीमेचा सामना करणे आणि दीर्घकालीन उपचार घेणे हा सामूहिक प्रवास आहे. प्रगत उपचारपद्धती आता या आजाराचे परिणाम बदलत आहेत; ज्यामुळे आजारमुक्त भविष्याची आणि जीवनाचा दर्जा टिकवून ठेवण्याची आशा निर्माण झाली आहे. तरीही, खरा आधारस्तंभ नेहमी घरामध्ये असतो. आपला प्रियजन, जो शांतपणे ऐकून घेतो, परिस्थिती समजून घेतो, प्रत्येक वळणावर पाठीशी उभा राहतो आणि शेवटपर्यंत साथ सोडत नाही.
Ans: स्तनात किंवा काखेत नवीन गाठ येणे, स्तनाच्या आकारात किंवा आकारमानात बदल होणे
Ans: दर महिन्याला मासिक पाळी संपल्यानंतर ५-७ दिवसांनी आरशासमोर उभे राहून स्तनांची तपासणी (Breast Self-Examination) करावी.
Ans: उपचार हे कर्करोगाच्या टप्प्यावर (Stage) अवलंबून असतात.