ही 6 लक्षणे दिसून येताच समजून जा... तुमची किडनी झालीये खराब; निष्काळजीपणा हिरावून घेईल आयुष्य
आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा आपल्या निरोगी आरोग्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आपल्या शरीरातील एकही अवयव जर खराब झाला तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर झालेला दिसून येतो. अलिकडेच जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले. ते बऱ्याच काळापासून अनेक आजारांनी ग्रस्त होते, ज्यामुळे त्यांची किडनी निकामी झाली आणि त्यांचे निधन झाले. किडनी आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाची कार्ये पार पडतो अशात याची काळजी न घेणे आपल्याला चांगलेच महागात पडू शकते. चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे किडनीवर परिणाम होऊ लागतो. यामुळे आपली किडनी खराब होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला किडनी खराब होण्याच्या काही महत्त्वपूर्ण लक्षणांविषयी माहिती सांगत आहोत ज्यांना वेळीच ओळ्खल्यास तुम्ही तुमच्या खराब किडनीचे आरोग्य सुधारू शकता आणि योग्य वेळी मेडिकल हेल्प घेऊन स्वतःला सुरक्षित करू शकता. खराब किडनीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो हे लक्षात ठेवा, यामुळे आपला जीवही जाऊ शकतो.
घोट्यांना आणि पायांना सूज येणे
कोणत्याही कारणाशिवाय जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये किंवा घोट्यांमध्ये वेदना जाणवत असेल किंवा सूज येत असेल तर याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. हे किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण करण्याचे काम करते. किडनीचे जर कार्य योग्य प्रकारे सुरु राहिले नाही तर शरीरात सोडियम जमा होऊ शकते, ज्यामुळे पाय, घोटे, पाय, हात आणि चेहरा सूजू शकतो.
थकवा आणि अशक्तपणा
किडनी खराब झाली की मग शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. तुम्हाला सतत काहीही न करता शरीरात जर थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.
युरीन पॅटर्नमध्ये बदल
किडनी खराब झाल्याचे मुख्य लक्षण हे युरीनच्या बदलत्या पॅटर्नमध्ये दिसून येते. वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री, गडद, गंजलेला किंवा तपकिरी लघवी,
फेसाळ लघवी ही याची काही उदाहरणे आहेत. तुमच्यासोबतही असं घडत असेल तर वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्नायू पेटके निर्माण होणे
सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्समधील असंतुलन स्नायू आणि नसांच्या कार्यात अडथळा आणू शकते. यामुळे स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात. म्हणून याकडेही दुर्लक्ष करू नका.
भूक न लागणे
किडनी खराब होऊ लागली की सतत मळमळ आणि उलटीची समस्या जाणवू लागते ज्यामुळे जास्त भूक लागत नाही. कमी भूक लागत असल्याचे आपले वजनही अचानक कमी होऊ लागते. ही सर्व लक्षणे जर तुम्हाला तुमच्या शरीरात बऱ्याच काळापासून जाणवत असतील तर सावध व्हा आणि लगेच रुग्णालय गाठा!
किडनी फेलर म्हणजे नक्की काय?
मूत्रपिंड निकामी होणे हा क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) चा शेवटचा टप्पा आहे जिथे मूत्रपिंड रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव योग्यरित्या फिल्टर करू शकत नाहीत. यामुळे शरीरात विषारी पदार्थ आणि द्रव जमा होतात, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
किडनी फेलरची कारणे कोणती?
उच्च रक्तदाब, मधुमेह, इतर मूत्रपिंडाचे आजार.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.