
photo- social media
वीकेंडला शहराच्या धकाधकीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, तर लोनावळ्याजवळील लोहगड किल्ला हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मुंबई आणि पुण्यापासून सहज पोहोचता येणारा हा ऐतिहासिक किल्ला ट्रेकिंगप्रेमी, इतिहास अभ्यासक,अॅडव्हेंचर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा किल्ला त्याच्या मजबूत तटबंदी, प्राचीन वास्तुकला आणि नयनरम्य परिसरामुळे वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतो. वीकेंड ट्रिप किंवा वन डे ट्रेकसाठी लोहगड हा परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे
लोहगड किल्ल्याचे स्थापत्य त्याच्या मजबूत लष्करी रचनेमुळे विशेष लक्ष वेधून घेते. किल्ल्यावर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा असे चार भव्य प्रवेशद्वार आहेत. आजही सुस्थितीत असलेल्या या दरवाज्यांवरील दगडी कोरीवकाम आणि बांधकाम त्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देतात.
लोहगडवरील ‘विंचुकडा’ हा किल्ल्याचा सर्वात प्रसिद्ध भाग आहे. विंचवाच्या शेपटीसारखा दिसणारा हा लांब आणि अरुंद तटबंदीयुक्त भाग पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथून सह्याद्रीच्या डोंगररांगांचे विहंगम दृश्य पाहता येते. ट्रेकिंग आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हा अनुभव खास ठरतो.
लोहगडचा सर्वाधिक लोकप्रिय ट्रेक माळवली रेल्वे स्थानकापासून सुरू होतो. सुमारे १० किलोमीटरचा हा मार्ग दोन ते तीन तासांत पूर्ण करता येतो. वाटेत प्राचीन भाजा लेण्या पाहण्याची संधी मिळते, त्यामुळे हा प्रवास निसर्गासोबतच इतिहासाचाही अनुभव देतो. ज्यांना कमी चालायचे आहे, त्यांच्यासाठी लोहगडवाडी गावापर्यंत मोटारमार्ग उपलब्ध आहे.
जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळ्यामुळे परिसर हिरवाईने नटलेला असतो, धबधबे आणि धुक्याचे दृश्य मन मोहून टाकते. मात्र, निसरड्या वाटांमुळे काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात हवामान आल्हाददायक असल्याने ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित होतो. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णता अधिक असल्याने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ट्रेक सुरू करणे योग्य ठरते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारे दृश्य विशेष आकर्षक असते.
रस्त्याने लोहगड मुंबईपासून सुमारे १०० किमी तर पुण्यापासून ६० किमी अंतरावर आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने लोणावळा आणि पुढे माळवलीपर्यंत सहज पोहोचता येते. बस, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षाची सुविधाही उपलब्ध आहे.
रेल्वेने जाणाऱ्यांसाठी माळवली हे सर्वात जवळचे स्थानक असून ते किल्ल्यापासून सुमारे ५ किमी अंतरावर आहे. लोणावळा रेल्वे स्थानकही जवळ असून तेथून स्थानिक रेल्वे किंवा टॅक्सीची सुविधा मिळते. हवाई मार्गाने जाणाऱ्यांसाठी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे ७० किमी, तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे १०० किमी अंतरावर आहे.
लोहगडच्या परिसरात अनेक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत. माळवलीजवळील प्राचीन भाजा लेण्या, अधिक उंचीवरील विसापूर किल्ला आणि लोणावळ्याजवळील कार्ले लेण्या पर्यटकांसाठी खास आकर्षण आहेत. याशिवाय लोणावळ्याचे आल्हाददायक वातावरण आणि प्रसिद्ध चिक्कीची चवही अनुभवता येते.