
महाराष्ट्रावर सिकलसेल आजाराचे सावट! विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती
महाराष्ट्रात सिकल सेल आजार ही केवळ वैद्यकीय समस्या न राहता सार्वजनिक आरोग्याचे मोठे आव्हान बनत चालली आहे. विशेषतः आदिवासीबहुल भागांमध्ये या अनुवांशिक रक्तविकाराचे प्रमाण लक्षणीय असल्याचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासातून सातत्याने समोर येत आहे. लाल रक्तपेशींच्या रचनेतील जन्मजात दोषामुळे होणाऱ्या या आजारामुळे वेदना, संसर्ग, अवयवांचे नुकसान आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो; त्यामुळे लवकर निदान व दीर्घकालीन व्यवस्थापन अत्यावश्यक ठरते. राज्यातील आदिवासी समुदायांमध्ये एचबीएस (सिकल सेल जन) चे प्रमाण काही ठिकाणी ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत असल्याचे शास्त्रीय अभ्यास सूचित करतात. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हा आजार आणि त्याचे वाहक (कॅरिअर) मोठ्या प्रमाणावर आढळतात. याच पार्श्वभूमीवर राज्याने राष्ट्रीय सिकल सेल एनिमिया उन्मूलन मोहिमेअंतर्गत व्यापक तपासणी आणि उपचारांची चक्रे वेगाने फिरवली आहेत. (फोटो सौजन्य – istock)
दरम्यान राज्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये येत्या १५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत १८ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत मोहिमेची व्यापक पूर्वतयारी करण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष तपासणी पंधरवडा राबविण्यात येईल, सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना अत्यंत महत्त्वाचे असून, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
सन २००८ पासून सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम आदिवासी व दुर्गम भागात प्रभावीपणे राबविला जात असून, ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, रायगड व हिंगोली या २१ जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.सिकलसेल सोल्युबिलिटी चाचण्या २०१९ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत झाल्या आहेत.
सिकलसेल हा रक्त पेशीसंबंधित गंभीर आजार आहे. राज्यात २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या सहा वर्षांत १ कोटी ५ लाख ८६ हजार ७३३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत १२ हजार ४२० रुग्णांना सिकलसेल आजाराचे निदान झाले आहे. तसेच हा आजार अनुवांशिक असल्यामुळे आईवडिलांमुळे मुलांना सुद्धा होण्याची शक्यता असते.
थंडीमुळे सांधे होतायत कडक? हिवाळ्यामध्ये ‘हे’ आरोग्य मंत्र तुमच्या हाडांची – सांध्यांची घेतील काळजी