
Varai Appe Recipe:(फोटो- सोशलमीडिया)
वरई पासून बनणारे हे अप्पे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लागतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करायला एकदम सोप्पे आणि खुसखुसीत लागतात. Varai Appe Recipe:
वरई किंवा भगर – 1 कप
साबुदाणा – पाव कप
दही – 1 कप,
उकडलेला बटाटा – 1 मध्यम, चांगला कुस्करून घ्या
हिरवी मिरची – 2 ते 3, बारीक चिरून किंवा ठेचून
जिरे – 1 छोटा चमचा
इनो किंवा खायचा सोडा – अर्धा चमचा
उपवासाचं मीठ – चवीपुरतं
तेल – अप्पे भाजायला
पहिली स्टेप – भिजवून घेणे
आधी वरई आणि साबुदाणा एकत्र करून दोन-तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका भांड्यात पाणी टाकून 3 ते 4 तास भिजत ठेवा. साबुदाणा फुगला पाहिजे.
दुसरी स्टेप – वाटून घेणे
4 तासांनंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाका. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये टाका. यात जास्त पाणी टाकू नका. थोडं दही टाकून जाडसर वाटून घ्या. अगदी बारीक पेस्ट नाही करायची, थोडं जाडसर ठेवा म्हणजे अप्पे कुरकुरीत होतात.
Astro Tips: चुकून उपवास मोडला तर काय करावं? धर्मशास्त्रामध्ये …
तिसरी स्टेप – मिश्रण तयार करणे
आता हे वाटलेलं मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढा. त्यात कुस्करलेला बटाटा टाका. दही, हिरवी मिरची, जिरे आणि मीठ टाका. सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्या. मिश्रण खूप घट्ट वाटलं तर थोडं अजून दही टाका. इडलीच्या पिठासारखं असावं.
चौथी स्टेप – सोडा टाकणे
आता सगळ्यात महत्वाची गोष्ट. जेव्हा अप्पे करायचे असतील तेव्हाच त्यात अर्धा चमचा इनो किंवा सोडा टाका आणि एकाच दिशेने हलक्या हाताने मिक्स करा. जास्त घुसळू नका. सोडा टाकल्यावर पीठ फुगेल.
Upvas Recipe : नवरात्री स्पेशल; भगरीपासून सकाळच्या नाश्त्याला बनवा …
पाचवी स्टेप – अप्पे भाजणे
आता गॅसवर अप्पेपात्र ठेवा. गरम झालं की प्रत्येक खड्ड्यात थोडं थोडं तेल टाका. तेल गरम झालं की चमच्याने पीठ प्रत्येक खड्ड्यात टाका. पूर्ण भरू नका, अर्धच भरा कारण ते फुगतं.आता झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर 3-4 मिनिट भाजू द्या. खालची बाजू सोनेरी झाली की चमच्याने किंवा काट्याने उलट करा. दुसरी बाजू पण खमंग भाजून घ्या. दोन्ही बाजूने लालसर आणि कुरकुरीत झाले की काढून घ्या.झाले, तुमचे गरमागरम उपवासाचे अप्पे तयार आहेत. हे अप्पे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. खोबऱ्याच्या चटणीसोबत पण एकदम भारी लागतात. वरून थोडं तूप टाकलं तर अजूनच चव वाढते.नवरात्रीत एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. रोजच्या साबुदाणा खिचडीपेक्षा हे अप्पे खायला जास्त मजा येईल आणि पोट पण भरेल.
(टीप- दही जास्त आंबट घेऊ नका, ताजं दही असावे किंवा त्यापेक्षा तुम्ही ताक घेतलं तरी चालेल)