मासिक पाळीत महिलांना का जोडीदाराची गरज भासते (फोटो सौजन्य - iStock)
अनेकदा प्रत्येक प्रवासात आपण एकट्याने चालत असतो. बरेचदा आपल्यासह कोणीतरी असावं ही भावना असते पण एका प्रवासात मात्र एकट्याने चालणे क्वचितच मुक्ततेची भावना देते. तो म्हणजे मासिक पाळीतील प्रवास. शिल्पी घोष, ब्रॅण्ड अँड मार्केटिंग कम्युनिकेशन्स, टाटा ट्रस्ट्स यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
मासिक पाळीचे प्रवास हे थोड्याफार फरकाने एकट्याने करावे लागतात, बहुतेकदा हे दिवस एकाकी असतात, मासिक पाळीतून जाणारीला एकटीनेच तिची वाट काढावी लागते. पिढ्यानुपिढ्या चालत आलेले समज, कुजबुजत दिले जाणारे इशारे आणि सांस्कृतिक अवघडलेपणा यांमुळे मासिक पाळी हे आपले खासगी ओझे आहे आणि आपण एकटीनेच ते वाहायचे आहे अशी मानसिकता तयार झालेली असते. मासिक पाळीशी निगडित शब्दांचाही मनात आनंद निर्माण करण्याशी काहीच संबंध नसल्याने परिस्थिती आणखीनच बिकट होते. हे शब्द म्हणजे वेदना, पॅड्स, वेदनाशामक औषधे, मुरुमं, पीसीओडी, पितृसत्ताक व्यवस्था! ही यादी कधीच संपणार नाही पण मासिक पाळीशी जोडलेल्या भयाचे चित्र रंगवण्यास एवढे शब्द पुरेसे आहेत.
मासिक पाळी
२१व्या शतकाच्या २५व्या वर्षातही मासिक पाळी सुरू असलेल्यांना या चार दिवसांच्या काळात आपल्या कोशात बंदिस्त झालेच पाहिजे का? ही लढाई एकटीनेच लढणे खरोखर आवश्यक आहे का? आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपला ज्यांच्यावर विश्वास आहे अशा व्यक्तींनी घेतलेल्या काळजीपासून, त्यांच्या प्रेमापासून, मासिक पाळीच्या काळात वंचित राहावे लागणे योग्य आहे का? हे केवळ अलंकारिक भाषेत विचारलेले प्रश्न नाहीत; या प्रश्नांची केवळ उत्तरे देणे पुरेसे नाही, त्यांच्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे.
मासिक पाळीतील सोबती
आपण एक नवीन ‘P’ शोधून काढला तर- आपल्या आयुष्याच्या प्रत्येक बाजूत आपल्याला मनापासून हवा असलेला पण मासिक पाळीशी आपण ज्याचा संबंध क्वचितच जोडतो असा ‘P’ आपण शोधून काढला तर? हा काही नुसता शब्दांचा खेळ नाही किंवा अनुप्रास साधण्याचा प्रयत्न नाही. हा ‘P’ आपल्या आत्म्यात दीर्घकाळापासून रुजलेला आहे. आपण त्याला कधीच नाव दिले नाही किंवा तो साजरा केला नाही एवढेच. हा लपलेला सोबती, शांतपणे आपल्या सोबतीने चालत असतो.
अद्वितीय अशा फिलिप कोटलर यांनी दिलेली ‘फोर पीज’चे वरदान जाहिरात आणि मार्केटिंग क्षेत्रातील व्यावसायिक म्हणून आम्ही दीर्घकाळापासून जगत आहोतच. मात्र, मासिक पाळीचे कथनच बदलून टाकण्याची शक्ती या ‘P’मध्ये आहे, मासिक पाळीला खासगी बाबीपासून सहयोगापर्यंत नेण्यात सक्षमताही आहे, हे खरे तर खूप आधीच घडायला हवे होते. हा ‘पी’ आहे पीरियड पार्टनरचा, तो पॉझिटिविटी (सकारात्मकता), पॉवर (शक्ती) आणि अगदी प्राइडही (अभिमान) घेऊन येतो.
पिरियड पार्टनर म्हणजे काय?
तर हा पिरियड पार्टनर नेमका आहे कोण? कोणत्याही खऱ्याखुऱ्या सोबत्यासारखा हा सोबतीही मासिक पाळीचा प्रवास अधिक सोपा, अधिक सुसह्य, कमी वेदनादायी करतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खूप काळजी घेतो. हा सोबती तुमच्या आईवडिलांपैकी कुणी असू शकतो, भावंडांपैकी असू शकतो, नवरा, मित्र-मैत्रिणींपैकी कुणी किंवा अगदी तुमची सासूही असू शकते, पीरियड पार्टनरची स्पष्ट अशी व्याख्या नाही. तुम्हाला समजून घेणारी, तुमची काळजी घेणारी, तुमच्या पाठीशी उभी असलेली कोणतीही व्यक्ती तुमचा पीरियड पार्टनर होऊ शकते. मासिक पाळीतून जाणाऱ्या व्यक्तीला ती एकटी नाही याची जाणीव पीरियड पार्टनर छोट्या-छोट्या गोष्टींद्वारे करून देऊ शकतो.
गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या मासिक पाळीचा आरोग्यावर होणारा परिणाम
आईची भूमिका कशी
यात आपण आईची भूमिका बघू. आईवर पीरियड पार्टनर असा शिक्का मारला गेला नाही, तरी मुलीची मासिक पाळी सुरू होते, तेव्हा तिची पहिली पीरियड पार्टनर बहुतेकदा आईच असते. अर्थात भारताच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी परिस्थिती अद्यापही चिंताजनकच आहे. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर नेमके काय करायचे याबाबत माता त्यांच्या मुलींना आधीपासून माहिती देत नाहीत किंवा सज्ज करत नाहीत असे संशोधनांतून पुढे आले आहे.
बहुतेक कुटुंबांमध्ये मासिक पाळी हे प्रकरण दडवूनच ठेवले जाते, वडिलांना तर त्याबाबत माहितीच नसते, मासिक पाळी आली म्हणजे आता लवकरच लग्नाच्या चर्चा सुरू होतील म्हणून याबाबत फार कुणाला कळू दिले जात नाही. अर्थात या सगळ्या मर्यादा असूनही आईची पीरियड पार्टनर ही भूमिका मुलभूत आहे. मासिक पाळीकडे संकट म्हणून न बघता मातृत्वासाठी सक्षम झाल्याचे प्रतीक म्हणून तसेच चांगल्या आरोग्याचे प्रतीक म्हणून बघण्याची क्षमता आई मुलीला देऊ शकते.
मार्गदर्शनाची भावनिक जबाबदारी
मुलीला या प्रवासात मार्गदर्शन करण्याची भावनिक जबाबदारी दीर्घकाळापासून आईवर सोपवली गेली आहे. पारंपरिक रचनेत पुरुष दूरच असायचे. असंख्य भारतीय कुटुंबांमध्ये पुरुष, म्हणजेच वडील, भाऊ किंवा नवरा, वर्तुळाच्या परिघावरच उभे असतात. या प्रदेशात पाऊल टाकावे की नाही या संभ्रमात ते असतात, बहुतेकदा बाहेरच राहण्याचा पर्याय निवडतात. मात्र, पुरुषाने या वर्तुळात पाऊल टाकूच नये असे कुठे आहे? आणि हे पाऊल नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा तोडगा काढण्यासाठी टाकायचे नाही, तर पीरियड पार्टनर म्हणून पाठीशी उभे राहण्यासाठी टाकायचे आहे.
आज पुरुषत्वाची व्याख्या उत्क्रांत होत आहे. पुरुषत्व म्हणजे सर्व समस्यांवर उपाय हाती असणे नव्हे, तर समस्येतून जाणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी असणे. आधार देण्यासाठी फार भव्य काही करावे लागत नाही. तिला वेदना होत आहेत, अवघडल्यासारखे वाटत आहे याची केवळ दखल घेणेही कधी कधी पुरेसे असते. मासिक पाळीच्या काळात लागणाऱ्या वस्तू तिला सहजपणे आणून देणे किंवा मासिक पाळीकडे लज्जास्पद म्हणून न बघता सामान्य गोष्ट म्हणून बघणारे वातावरण घरात निर्माण करणे याचाच भाग आहे. कदाचित यातच खरे पुरुषत्व आहे.
सासूची जबाबदारी
स्त्रिया, विशेषत: सासू, घरात वर्षानुवर्षे निभावत आलेली भूमिकाही तेवढीच महत्त्वाची आहे. परंपरा आणि कुटुंबातील रुढींचे दीर्घकाळ पालन करत आलेली सासू ही नेहमीच कुटुंबाच्या वारशाला आकार देते. स्त्रीला तिचे जीवशास्त्रीय बदल लज्जेसह नव्हे तर प्रतिष्ठेने जगू देण्याची परवानगी देणे हा आता वारसा जपण्याचा सर्वोत्तम भाग ठरवला पाहिजे.
साचेबद्ध कल्पना मोडून काढत सासूने तिच्या सुनेची मासिक पाळीच्या काळातील ‘पार्टनर’ होणे हे कायापालट घडवून आणणारे तसेच समजूत बदलण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरेल. सासू-सून यांच्यातील संबंध आता प्रगतीशील मूल्ये व परंपरागत समज यांच्यातील रस्सीखेच ठरू नयेत.
वेगवेगळे टप्पे
मासिक पाळीतून जाणाऱ्या स्त्रीला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या पिरियड पार्टनर्सचा लाभ मिळू शकतो, गरम पाण्याची पिशवी देणाऱ्या आणि मनातील सगळे ऐकून घेणाऱ्या मैत्रिणीपासून ते मासिक पाळीच्या तारखा लक्षात ठेवणारा जोडीदार आणि ‘फार ताण घेऊ नकोस’ असे सहजपणे सांगणाऱ्या सहकाऱ्यांपर्यंत सगळेच पीरियड पार्टनर्स महत्त्वाचे असतात. हे सर्व जण मासिक पाळीच्या अनुभवाला नवीन आकार देतात आणि चांगली गोष्ट म्हणजे मासिक पाळीचे अनेक सोबती असण्यात गैर काहीच नाही; यात फसवणूकीचा संबंध नाही, उलट त्यात जिव्हाळा असतो.
आपल्याला जे खरे स्थित्यंतर घडवून आणायचे आहे ते केवळ उत्पादने किंवा धोरणांमध्ये नाही, तर लोकांमध्ये आहे. मासिक पाळीतून जाणाऱ्या स्त्रीच्या सोबतीने उभे राहणारे आणि दीर्घकाळ जो प्रवास एकाकी समजला जात होता, त्याला सामूहिक रूप देणारे लोक यासाठी आवश्यक आहेत.