मासिक पाळीतील थकवा आणि अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी या पेयाचे करा सेवन
प्रत्येक महिन्यातील चार किंवा पाच दिवस सर्वंच महिलांना मासिक पाळी येते. मासिक पाळी आल्यानंतर आरोग्य संबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्या वाढू लागल्यानंतर मानसिक तणाव निर्माण होतो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मासिक पाळी आल्यानंतर पहिल्या दिवशी आराम करण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. डोके दुखी, मूड स्विंग्स, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय अंगदुखी, चिडचिड , थकवा, पोटदुखी आणि पचनाच्या समस्या उद्भवल्यानंतर शरीराची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
मासिक पाळीत कंबर दुखी किंवा पोटात वेदना वाढू लागल्यानंतर महिला मेडिकलमधील पेन्किलर गोळ्यांचे सेवन करतात. यामुळे तात्पुरता आराम मिळतो. पण वारंवार पेन्किलरच्या गोळ्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पेयाचे सेवन करावे? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबदल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
पुदिन्याच्या पानांचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. पुदिन्याच्या पानांचा सुगंध शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी मदत करतो. तसेच यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म पोटात वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. सकाळी उठून नियमित पुदिन्याच्या पानांचा चहा पाल्यास पोटाच्या समस्या कायमच्या दूर होतील. मासिक पाळीतील वेदनापासून झटपट आराम हवा असेल तर पुदिन्याच्या पानांचा चहा प्यावा. यामुळे थकवा, अशक्तपणा कमी होतो.
पुदिन्याच्या पानांचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून घ्या. पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्यात पुदिन्याची पाने, किसलेले आलं घालून व्यवस्थित चहा उकळवून घ्या. चहाला एक उकळी आल्यानंतर त्यात थोडंस गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेला चहा गाळून त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा आणि नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.