लहान मुलांमधील वाढता लठ्ठपणा (फोटो सौजन्य - iStock)
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये ५ वर्षांखालील जागतिक स्तरावर ३५ दशलक्षांहून अधिक मुलांना जास्त वजनाची मुलं म्हणून वर्गीकृत करण्यात आले आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ती एक चिंतेची बाब ठरत आहे. बालवयातील लठ्ठपणावर जर वेळीच लक्ष दिले नाही तर ते दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते. यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे जुनाट आजारच नाहीत तर आत्मविश्वास कमी होणे आणि नैराश्य यासारख्या भावनिक आणि मानसिक आरोग्य समस्यांचा देखील समावेश आहे.
भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी आणि आपल्या मुलांनी निरोगी रहावे यासाठी पालकांनी आपल्या मुलांना आहाराच्या निरोगी सवयी लावणे आणि नियमित शारीरिक हालचालींनी वजन व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पालकांनी मुलाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि मुलांना वजन नियंत्रणात राखण्यास मदत केली पाहिजे.
लठ्ठपणा ही एक वैद्यकीय स्थिती आहे जिथे मूल त्याचे वय आणि उंचीच्या तुलनेत जास्त वजनाचे ठरते. हे जास्त वजन मुलाच्या शारीरिक आरोग्यावर, भावनिक आरोग्यावर आणि सामाजिक विकासावर गंभीर परिणाम करू शकते.
बालपणातील लठ्ठपणा वाढण्यास अनेक घटक कारणीभूत ठरतात, ज्यात शारीरिक हालचालींचा अभाव, आहाराच्या चुकीच्या सवयी, अनुवंशिकता, कौटुंबिक इतिहास, स्क्रीन टाईम आणि तणाव यांचा समावेश आहे. लक्षणांमध्ये जलद गतीने वजन वाढणे, हार्मोनल असंतुलन, दम लागणे, सांधेदुखी आणि थकवा यांचा समावेश असू शकतो. दुर्दैवाने, जर वेळीच लक्ष दिले नाही तर ते टाइप २ मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, यकृताच्या समस्या, अकाली तारुण्य आणि अगदी ऑर्थोपेडिक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या बीएमआयचे निरीक्षण करणे गरजेचे आहे असे डॉ. सीमा जोशी(बालरोग तज्ज्ञ आणि किशोरवयीन समुपदेशक, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन,पुणे)यांनी स्पष्ट केले.
डॉ. कोचुरानी अब्राहम(चाईल्ड एंडोक्राइनोलॉजिस्ट, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन,पुणे) सांगतात की, बालपणातील लठ्ठपणा हा प्रौढांमधील गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरतो. जसे की टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, डिस्लिपिडेमिया, हृदयरोग, स्ट्रोक, पीसीओएस, स्लीप एपनिया, ऑस्टियोआर्थरायटिस, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, गॅस्ट्रो-एसोफेजियल रिफ्लक्स तसेच वंध्यत्वाचा धोका वाढतो. काही कर्करोगांच्या वाढीव जोखमीशी देखील याचा संबंध जोडला गेला आहे, उदाहरणार्थ स्तन, एंडोमेट्रियम, कोलन यासारखे कर्करोग.
जास्त वजनामुळे त्या मुलाला एकटेपणा, चिडचिड, नैराश्य, आतत्मविश्वास खालावणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतरांकडून थट्टा केली जाण्याच्या भीतीमुळे मूल समाजात मिसळणे टाळतात. काही मुलांना समुपदेशनाची देखील आवश्यकता भासते. लहान मुलांमधील लठ्ठपणाचे वेळीच व्यवस्थापन करणे हे प्रौढांमधील आरोग्य समस्या टाळण्यास मदत करते. निरोगी जीवनशैली बाळगणे आणि मुलांमध्ये लठ्ठपणा आणि संबंधित समस्या टाळणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
बालपणातील लठ्ठपणा हा आहार, व्यायाम आणि वर्तणुकीच्या सवयीद्वारे व्यवस्थापित केला जाऊ शकतो. निरोगी दिनचर्येचे पालन करण्यात कुटुंबांची भूमिका महत्त्वाची असते. पालकांनी मुलांच्या संतुलित आहाराच्या सवयींना प्रोत्साहन देत स्क्रीन टाइम कमी करुन शारीरिक हलचालींना प्रोत्साहन दिले पाहिजे. फळे, भाज्या, तृणधान्य, डाळी, मसूर, सुकामेवा आणि तेलबिया यांचा आहारात समावेश करा.
घरी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करा तसेच जेवणाच्या वेळा पाळा. टीव्ही पाहताना किंवा गॅझेट्सचा वापर करताना शर्करायुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळा. पालकांनी मुलाच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि मुलांच्या आहारात कशाचा समावेश असावा आणि कोणते पदार्थ टाळावे याबद्दल तज्ञांची मदत घेतली पाहिजे,अशी प्रतिक्रिया पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. अंजली शिंदे यांनी व्यक्त केली.
बालपणातील लठ्ठपणा रोखता येतो, परंतु त्यासाठी पालकांनी, शाळेतील शिक्षकांनी आणि तज्ञांनी प्रयत्न करणे गरेजेच आहे. योग्य पोषण, सक्रिय जीवनशैली आणि भावनिक आधार हे तुमच्या मुलांच्या आयुष्यात खूप मोठा फरक निर्माण करू शकते.
महामारीप्रमाणे पसरतोय लठ्ठपणा, 2030 पर्यंत 100 कोटी लोकं होतील लठ्ठ! अनेकांचा जाऊ शकतो जीव
बालपणातीस लठ्ठपणा हा केवळ दिसण्याबद्दल नाही, तो त्या मुलाच्या भावी आरोग्याबद्दल आहे असेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले. डॉ. जोशी यांनी लठ्ठपणाशी लढण्यासाठी दिलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स
अंकुरा रुग्णालयातील डॉ. जोशी, डॉ. कोचुराणी आणि डॉ. अंजली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, वैयक्तिकृत काळजी आणि सामुदायिक आरोग्य उपक्रमांद्वारे लहान मुलांमधील लठ्ठपणाची समस्या दूर करण्यास विशेष पाऊल उचलत आहे. बालपणीच्या लठ्ठपणाच्या दीर्घकालीन परिणामांविरुद्ध पालकांना जागरुक करत वेळीच उपचार करणे हा त्यावरील सर्वोत्तम पर्याय आहे.