पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट! कमी वेळेत तयार होणारे हाय प्रोटीन ‘सोया पकोडे’ एकदा घरी नक्की बनवून पहा
Soya Pakoda Recipe : या रेसिपीने तयार झालेले सोया पकोडे केवळ चविष्टच नाहीत, तर पौष्टिक देखील आहेत. पुढच्या वेळी पावसाळी संध्याकाळी काहीतरी वेगळं आणि हेल्दी खायचं ठरवलंत तर ही रेसिपी नक्की करून बघा.
सोयाबीनमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात
अनेकांना सोयाबीनची भाजी खायला आवडत नाही अशात तुम्ही यापासून काही नवीन तयार करू शकता
सोयाबीनचे कुरकुरीत भजी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरतात
पावसाळ्यात किंवा थंडीत संध्याकाळच्या वेळेला गरमागरम पकोड्यांचा प्लेट हातात घेतला की मन प्रसन्न होतं. आज आपण थोडं हेल्दी आणि प्रोटीनने भरपूर असे सोया पकोडे बनवणार आहोत. हे पकोडे बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असतात. सोया चं सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर असतं कारण त्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि ते स्नायूंना मजबूत ठेवतं. चहा किंवा कॉफीबरोबर सोया पकोडे खाण्याचा आनंद काही औरच असतो. या पकोड्यांमध्ये तुम्ही थोडं कांदा, हिरवी मिरची, आणि कोथिंबीर टाकली तर त्याची चव अजूनच वाढते. चला तर मग जाणून घेऊया स्वादिष्ट सोया पकोडे बनवण्याची सोपी आणि झटपट रेसिपी आणि यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळवा आणि त्यात सोया चंक्स घाला. 10 मिनिटे भिजू द्या. नंतर ते पाणी काढून चंक्स चांगले पिळून घ्या जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल.
एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन, तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला. त्यात थोडं-थोडं पाणी घालत घट्ट आणि गुळगुळीत पिठाचं मिश्रण तयार करा.
आता त्यात आले-लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून चांगलं मिसळा.
भिजवलेले आणि पिळलेले सोया चंक्स या मिश्रणात टाका आणि नीट हलवा, जेणेकरून प्रत्येक चंक्सवर बेसनाचं कोटिंग बसेल.
कढईत तेल तापवा. तेल मध्यम आचेवर गरम असावं, जास्त गरम नको, नाहीतर पकोडे बाहेरून जळतील आणि आतून कच्चे राहतील.
आता मिश्रणातील सोया चंक्स एकेक करून तेलात सोडा आणि सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळा.
तळलेले पकोडे टिश्यू पेपरवर काढून त्यातील अतिरिक्त तेल शोषून घ्या. नंतर गरमागरम सोया पकोडे हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
हवे असल्यास पकोड्यांच्या मिश्रणात थोडं लिंबाचा रस टाका, त्यामुळे चव आणखी तिखटसर आणि चटपटीत लागते.
डायट करणाऱ्यांसाठी हे पकोडे एअरफ्रायरमध्येही बनवता येतात.
Web Title: Perfect for evening snack or party snack know how to make soya pakoda at home recipe in marathi