
या रुग्णाच्या उजव्या डोळ्याला वेगाने वाढणारी सूज येत होती आणि विशेषतः उजव्या बाजूला पाहताना तिला एकाऐवजी दोन वस्तू (डबल व्हिजन) दिसत होत्या. ती उपचारासाठी आली, तेव्हा २८ आठवड्यांची (७ महिने) गरोदर होती. सुरुवातीच्या तपासणी आणि एमआरआय स्कॅननंतर पुढील उपचारांसाठी तिला जसलोक हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
तपासणीनंतर जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट न्यूरोसर्जरी डॉ. सुधीर आंबेकर यांनी शोधून काढले की, हा ट्यूमर डोळ्याच्या सॉकेटमध्ये (ऑर्बिट) होता, ज्याने ऑर्बिटच्या वरच्या भागाचे नुकसान केले होते आणि मेंदूच्या आतल्या भागापर्यंत पसरला होता. इमेजिंगच्या निष्कर्षांवरून हा ट्यूमर अत्यंत घातक असू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात होती.
महिला रुग्णाचे गरोदरपण लक्षात घेऊन तातडीने मल्टिडिसिप्लिनरी टीम तयार करण्यात आली. यामध्ये कन्सल्टंट न्यूरोसर्जरी डॉ. सुधीर आंबेकर, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी (प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ) डॉ. शिल्पा अग्रवाल आणि कन्सल्टंट न्यूरोअॅनेस्थेशिओलॉजी डॉ. राजश्री देवपुजारी यांचा समावेश होता. या टीमने प्रसूती होईपर्यंत उपचार पुढे ढकलणे किंवा गरोदरपणात शस्त्रक्रिया करणे यांसारख्या सर्व उपलब्ध पर्यायांचे काळजीपूर्वक मूल्यमापन केले.
रुग्ण तिच्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत (सेकंड ट्रायमेस्टर) असल्याने, जो काळ गरोदरपणात आवश्यक शस्त्रक्रियेसाठी सर्वात सुरक्षित मानला जातो, टीमने जोखीम आणि फायद्यांचे काळजीपूर्वक मूल्यमापन करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान माता आणि बाळ दोघांची सुरक्षितता आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी बारकाईने नियोजन करण्यात आले.
जुलै २०२४ मध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. डोळ्याच्या सॉकेटमधून (ऑर्बिट) आणि मेंदूच्या आतल्या भागातून ट्यूमर पूर्णपणे काढून टाकण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भावर सतत लक्ष ठेवले जात होते, तर भूल देण्याच्या (अॅनेस्थेटिक) विशेष नियमांमुळे न जन्मलेल्या बाळावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आणि पुढील गरोदरपणाचा काळ कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पार पडला. त्यानंतर आलेल्या बायोप्सीच्या अहवालाने मोठा दिलासा दिला, हा ट्यूमर बेनिन कॅपिलरी हेमांजिओमा नावाचा सौम्य स्वरूपाचा ट्यूमर असल्याचे समोर आले. या विशिष्ट ठिकाणी असा ट्यूमर आढळणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते, ज्याची जागतिक वैद्यकीय साहित्यात केवळ मोजक्याच केसेसमध्ये नोंद आहे.
या आजाराचे दुर्मिळ स्वरूप आणि ट्यूमर पुन्हा उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णावर पुढील १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ बारीक लक्ष (फॉलो-अप) ठेवण्यात आले. ती आता पूर्णपणे आजार-मुक्त असून ट्यूमर पुन्हा झाल्याचे कोणतेही लक्षण नाही. सध्या माता आणि मूल दोन्ही अत्यंत स्वस्थ आणि सुरक्षित आहेत.
या वैद्यकीय केसबाबत मत व्यक्त करत जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट न्यूरोसर्जरी डॉ. सुधीर आंबेकर म्हणाले की, “एका गरोदर महिला रुग्णाच्या डोळ्याचे सॉकेट आणि मेंदूच्या आतल्या भागापर्यंत पसरलेल्या ट्यूमरवर उपचार करण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि विविध वैद्यकीय विभागांमध्ये उत्कृष्ट समन्वयाची गरज होती. सुरुवातीला इमेजिंगच्या निष्कर्षांमुळे ही गाठ गंभीर आणि घातक असण्याची भीती निर्माण झाली होती, पण वेळेवर केलेल्या शस्त्रक्रियेमुळे माता आणि बाळ दोघांची सुरक्षा सुनिश्चित करून आम्हाला ट्यूमर पूर्णपणे काढून टाकण्यात यश आले. अखेर बायोप्सीमध्ये हा ट्यूमर बेनिन कॅपिलरी हेमांजिओमा असल्याचे निदान झाले आणि १८ महिन्यांनंतरही रुग्ण पूर्णपणे आजार-मुक्त आहे, ही बाब आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे.”
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी डॉ. शिल्पा अग्रवाल म्हणाल्या की, “गरोदरपणाच्या काळात अशा गुंतागुंतीच्या न्यूरोसर्जिकल समस्येचे व्यवस्थापन करताना मातेचे आरोग्य आणि गर्भाचे कल्याण या दोन्हीमध्ये समतोल साधणे आवश्यक असते. अत्यंत बारीक देखरेख आणि सहयोगी उपचारांच्या माध्यमातून आम्ही या आव्हानात्मक परिस्थितीवर यशस्वी मात करू शकलो आणि माता व तिचे न जन्मलेले बाळ या दोन्ही रुग्णांसाठी सर्वोत्तम परिणाम सुनिश्चित केला. ही केस गरोदरपणातील उच्च जोखीम असलेल्या वैद्यकीय परिस्थिती हाताळताना मल्टिडिसिप्लिनरी उपचारांचे महत्त्व अधोरेखित करते.”
सर्वांचे आभार व्यक्त करत श्रीमती आरजी म्हणाल्या, “मी डॉ. सुधीर आंबेकर आणि डॉ. शिल्पा अग्रवाल यांची आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांचे कौशल्य, संवेदनशीलता आणि सांघिक कामगिरीमुळे मी केवळ बरीच झाले नाही, तर माझ्या बाळाचा जीवही सुरक्षित राहिला. त्यांच्या या समर्पणामुळे आम्हा दोघांनाही आशेने भरलेले भविष्य लाभले आहे.”
या वैद्यकीय केसबाबत मत व्यक्त करत जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सीईओ श्री. जितेंद्र हरिया म्हणाले की, “प्रत्येक गुंतागुंतीच्या वैद्यकीय केसच्या मागे एक रुग्ण आणि त्याचे कुटुंब असते, जे अनिश्चितता आणि आशेच्या लाटेतून जात असतात. या केसमध्ये, आम्ही माता आणि बाळ दोघांचीही काळजी घेत होतो, ज्यामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली होती. या यशामधून आमच्या मल्टिडिसिप्लिनरी तज्ज्ञांचे समर्पण आणि सांघिक कामगिरी दिसून येते, ज्यांनी दोघांची सुरक्षा आणि आरोग्य सुनिश्चित केले. या यशामुळे जसलोक हॉस्पिटलमधील रुग्ण-केंद्री काळजी आणि क्लिनिकल उत्कृष्टतेप्रती आमची कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.”
ही केस विशेषतः गरोदरपणाच्या काळात गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल (मज्जासंस्थेशी संबंधित) आजारांवर उपचार करताना आजाराचे लवकरात लवकर होणारे निदान, वेळेवर केलेली शस्त्रक्रिया आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सामूहिक कौशल्याचे महत्त्व दर्शवणारे उत्तम उदाहरण आहे.