
AQI चा प्राण्यांवर काय होतोय दुष्परिणाम (फोटो सौजन्य - IStock)
कुत्री इतकी असुरक्षित का असतात?
कुत्री माणसांच्या तुलनेत शरीराच्या वजनाच्या प्रति किलो अधिक हवा श्वासातून घेतात आणि ते जमिनीच्या फार जवळ राहतात. जमिनीच्या या भागांत PM2.5 आणि PM10 सारखे जड कण जास्त प्रमाणात साचतात. सूक्ष्म कण नाकातील नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला चकवा देऊन थेट श्वासनलिकांमध्ये आणि फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊ शकतात. त्यामुळे दाह निर्माण होतो आणि हळूहळू श्वसन आरोग्य खालावते. जागतिक अभ्यासांमध्ये खराब हवेमुळे कुत्र्यांमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण वाढणे आणि श्वसनमार्गात बदल होणे यांचा संबंध आढळला आहे. यामध्ये घरातील प्रदूषण (धूर, उदबत्ती, स्वच्छता स्प्रे) बाहेरील धुरक्याला अधिकच हातभार लावते.
भारतीय शहरांमध्ये पशुवैद्यकतज्ज्ञ काय पाहत आहेत
गेल्या काही हिवाळ्यांमध्ये दिल्ली, मुंबई आणि इतर महानगरांमधील पशुवैद्यांनी खोकला, धाप लागणे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, डोळ्यांची जळजळ आणि प्रदूषणाच्या संपर्कामुळे होणारे पचनाचे त्रास अशा समस्यांनी ग्रस्त कुत्र्यांची संख्या वाढल्याचे नोंदवले आहे. पग, शिह त्झू यांसारख्या छोट्या आकाराचे नाक असलेल्या प्रकारातील कुत्री, वयाने मोठे असलेले श्वान आणि आधीपासून हृदय किंवा फुफ्फुसांचे आजार असलेल्या श्वानांना विशेष धोका असतो.
कारण त्यांची श्वसनक्षमता आधीच कमी झालेली असते. दिल्लीमध्ये PM2.5 पातळी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा 15–20 पट अधिक असल्याची वारंवार नोंद झाली आहे आणि प्रदूषणामुळे झालेल्या ब्रॉन्कायटिससाठी कुत्र्यांना नेब्युलायझरची गरज भासल्याच्या अनेक घटना बातम्यांमध्ये झळकल्या आहेत. त्यामुळे AQI ही पाळीव प्राण्यांच्या कुटुंबांसाठी प्रत्यक्ष आपत्कालीन स्थिती ठरत आहे.
Air Pollution Delhi : राजधानी दिल्लीत प्रदूषणामुळे हवा बनतेय विषारी; थेट मेंदूवर होतोय परिणाम…
पाळीव प्राण्यांच्या पालकांनी कधीही दुर्लक्ष करू नयेत अशी लक्षणे
प्रदूषित हवा सहसा कुत्र्यांमध्ये एकदम तीव्र परिणाम, झटका देत नाही; उलटपक्षी अशा प्रदूषित हवेमुळे त्यांच्या आरोग्यावर हळूहळू दुष्परिणाम होतो. पाळीव प्राण्यांच्या पालकांनी सततचा खोकला, श्वास घेताना घरघर किंवा आवाज येणे, हलक्या हालचालीनंतरही जास्त धाप लागणे, लाल व पाणावलेले डोळे आणि वारंवार पापण्या झपकावणे किंवा चेहऱ्यावर पंजा फिरवणे; नाकातून स्राव, शिंक येणे किंवा वारंवार घसा खवखवणे; तसेच फिरायला गेल्यावर लवकर थकवा येणे किंवा खेळण्याची अनिच्छा यांसारख्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. कारण ही AQI च्या संपर्कामुळे निर्माण झालेल्या अंतर्गत श्वसन त्रासाची चिन्हे असू शकतात.
जास्त प्रदूषणाच्या काळात दैनंदिन संरक्षण
प्रदूषणाच्या उच्च पातळीच्या काळात खराब हवेपासून पूर्णपणे दूर राहणे अशक्य असते, परंतु काही सोप्या आणि सातत्यपूर्ण उपायांनी कुत्र्यांचे संरक्षण लक्षणीयरीत्या करता येते. फिरायला नेण्यापूर्वी AQI तपासा आणि प्रदूषण कमी असलेल्या वेळा निवडा, तसेच जास्त रहदारी असलेले रस्ते टाळा; “poor (वाईट)” किंवा “severe(अतिवाईट)” दिवसांमध्ये बाहेरचा वेळ कमी ठेवा आणि त्याऐवजी घरात खेळण्यावर भर द्या. फिरून आल्यावर पंजे, अंगावरील केस आणि चेहरा ओल्या कापडाने पुसा, जेणेकरून साचलेली धूळ आणि रसायने कुत्रे चाटणार नाहीत.
पाळीव प्राण्यांच्या आसपास धूम्रपान, तीव्र रूम स्प्रे आणि कडक स्वच्छता द्रव्ये टाळा, शक्य तिथे हवेशीरपणा वाढवा आणि शक्य असल्यास एअर प्युरिफायरचा विचार करा. ब्रॅकिसेफॅलिक जातीची, वयाने मोठी असलेली कुत्री किंवा हृदय/श्वसन समस्यांनी ग्रस्त कुत्र्यांसाठी, धुरक्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक इनहेलर, ब्रॉन्कोडायलेटर किंवा नेब्युलायझेशन योजना याबाबत पशुवैद्यांशी चर्चा करा.
पोषणासाठी, ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी अँटिऑक्सिडंट-समृद्ध आहार द्या. त्यामध्ये ब्लूबेरी, भोपळा, रताळी, थोड्या प्रमाणात ब्रोकली, सॅल्मन किंवा ओमेगा-3 चे स्रोत दाह कमी करण्यासाठी, पशुवैद्यांनी दिलेल्या मात्रेत हळद आणि आतड्यांतील प्रतिकारशक्तीला आधार देण्यासाठी प्रोबायोटिक दही यांचा समावेश असावा. हे उपाय प्रदूषणामुळे झालेले आजार बरे करत नाहीत पण फुफ्फुसांचे आरोग्य मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे नेहमी आधी पशुवैद्यांचा सल्ला घ्या आणि अशा घटकांचा समावेश असलेले दर्जेदार पॅकेज्ड डॉग फूड निवडा.
“वन हेल्थ”चा इशारा
संशोधनातून हे अधिकाधिक स्पष्ट होत आहे की खराब गुणवत्तेची हवा क्रॉनिक ब्रॉन्कायटिसपासून ते कमी प्रतिकारशक्ती आणि त्यातून वाढलेल्या रुग्णालय भेटींपर्यंत माणसे आणि प्राणी दोघांनाही सारख्याच प्रकारे हानी पोहोचवते. त्यामुळे भारतातील वाढता AQI हा केवळ मानवी आरोग्याचा विषय नाही; तो पाळीव प्राण्यांसह संपूर्ण कुटुंबांसाठी एक सामायिक पर्यावरणीय धोका आहे.
पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी असणारा संदेश साधा सोपा आहे: जर हवा तुमच्यासाठी वाईट असेल, तर ती बहुतेक वेळा तुमच्या कुत्र्यासाठी आणखी वाईट असते. सुरुवातीची लक्षणे ओळखणे, उच्च AQI काळात दिनचर्या बदलणे आणि घरातील प्रदूषण सक्रियपणे कमी करणे या गोष्टी बाहेरील हवा सर्वांसाठी सुरक्षित होईपर्यंत, कुत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात.
प्रोबायोटिक्सद्वारे प्रतिकारशक्ती वाढवा
आतड्यांतील उपयुक्त जिवाणूंना आधार देणे महत्त्वाचे आहे. असे जीवाणू पचन, प्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्य व स्वास्थ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हे लाभदायक जिवाणू वाढण्यासाठी त्यांना प्रीबायोटिक्सची गरज असते. आहारातील हे विशेष प्रकारचे फायबर त्यांचे अन्न असते. कुत्र्यांच्या आहारात योग्य प्रीबायोटिक्सचा समावेश केल्यास हे चांगले जिवाणू मजबूत राहतात, वाढतात आणि आतड्यांची स्थिती संतुलित ठेवतात. जोडीला, कमी चरबीची प्रथिने (चिकन, मासे), खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, कॉपर, झिंक, सेलेनियम, आयोडीन इ.), जीवनसत्त्वे (A, D, E, B-कॉम्प्लेक्स) आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स यांचा समतोल आहार देऊन आपल्या कुत्र्याची प्रतिकारशक्ती अधिक बळकट करा.