फोटो सौजन्य - Social Media
कोकण हा नुसताच निसर्गसंपन्न नाही, तर इतिहास, परंपरा आणि रहस्यांनी भरलेली भूमी आहे. येथे प्रत्येक डोंगर, झाड, नदी आणि खडक एक कथा सांगतो, काही प्रेरणादायक, काही रंजक, तर काही थरारक आणि गूढ. कोकणातील अशाच एका रहस्यमय जागेची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सालवा डोंगर. कणकवलीहून वैभववाडीकडे जाताना हिरवाईने नटलेला, तटबंदीप्रमाणे दिसणारा हा डोंगर लक्ष वेधून घेतो. मात्र याचे खरे आकर्षण आहे त्याच्याशी निगडीत एक भयाण आणि अनोखी आख्यायिका ‘ती’ दगडी वरात.
कथेनुसार, अनेक दशकांपूर्वी या डोंगरातून एक वरात जात होती. आनंद, उत्साह, वाजंत्री, नाचगाणी यामुळे वातावरण आनंदमय होते. नवरा-नवरी सजलेले, पाहुणे जल्लोषात सहभागी झालेले. सर्व काही अगदी पारंपरिक आणि आनंददायी. मात्र, सालवा डोंगरात पाऊल टाकताच काहीतरी अघटित घडले. संपूर्ण वरात दगडात रूपांतरित झाली. नवरा, नवरी, वऱ्हाडी, वाजंत्री सगळेच जण एका क्षणात शिळा बनले. आजही डोंगरात त्या दगडांचे आकार व नक्षी पाहिल्यास ते मानवी रूपांची आठवण करून देतात.
या घटनेमागे नेमकं काय घडलं, याचा ठोस पुरावा नसला तरी स्थानिक लोकांमध्ये या गोष्टीविषयी प्रचंड श्रद्धा आणि भीती आहे. आजही या डोंगरातून जाणारे लोक वऱ्हाड दगडांना मान देतात. असं म्हणतात की जर मान दिली नाही तर काही तरी विचित्र घडू शकतं.
सालवा डोंगरातील ही कथा आता त्या परिसरातील एक परंपरा बनली आहे. स्थानिकांपासून पर्यटकांपर्यंत सगळेच या गोष्टीकडे एक विशेष आदराने पाहतात. अनेकजण तर याला अंधश्रद्धा मानतात, तर काहींना ती इतिहासाशी जोडलेली शोकांतिका वाटते. मात्र सत्य हेच की, कोकणातील ही गूढ कथा आजही थरारक आहे आणि त्या डोंगरावरून जाणाऱ्या प्रत्येक पावलाला एक वेगळी अनुभूती देते.