
चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर तांदळाच्या पिठात मिक्स करा हे पदार्थ
वातावरणात होणारे बदल, आहारात होणारे बदल, अपुरी झोप, पचनाच्या समस्या, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा अधिकच निस्तेज होऊन जाते. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेल्या घाणीचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे सौंदर्य लगेच बिघडून जाते. त्यामुळे त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा काळे डाग घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण यामुळे चेहऱ्यावर काहीकाळा पुरताच ग्लो टिकून राहतो. वारंवार महागड्या स्किन केअरचा वापर केल्यामुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि सुकलेल्यासारखी वाटते.(फोटो सौजन्य – istock)
सर्वच महिलांना कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पिंपल्स, डाग आल्यानंतर चेहऱ्यावर कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी तांदळाच्या पिठात कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तांदळाचे पीठ त्वचेसाठी गुणकारी ठरते. यामध्ये विटामिन -बी, अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्यावर डाग घालवण्यासाठी मदत करते. तसेच तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे त्वचा उजळदार होते.
फेसपॅक बनवण्यासाठी मोठ्या वाटीमध्ये, तांदळाचे पीठ, कोरफड जेल आणि गुलाब पाणी टाकून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होईल. चेहऱ्यावर जमा झालेली घाण, डेड स्किन कमी करण्यासाठी तांदळाचे पीठ गुणकारी ठरते. गुलाब पाण्याच्या वापरामुळे त्वचेमधील पीएच लेव्हल संतुलित राहते आणि त्वचा मऊ, मुलायम होते. कोरफड जेल त्वचा हायड्रेट ठेवते. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. फेसपॅक १० ते १५ मिनिटं चेहऱ्यावर ठेवून नंतर त्वचा पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. कोणताही फेसपॅक चेहऱ्यावर लावून झाल्यानंतर टोनर लावावे. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो.
तांदळाच्या पिठाचा वापर जेवणात भाकरी बनवण्यासाठी केला जातो. त्वचेला ज्याप्रमाणे वरून पोषण दिले जाते तसेच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. तांदळाचे पीठ चेहऱ्यावर लावल्यामुळे पिंपल्सचे डाग, तेलकट आणि काळेपणा कमी होऊन जातो. याशिवाय त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आठवड्यातून दोनदा तांदळाच्या पिठाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा.