सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळा असो उन्हाळा असो किंवा हिवाळा, अनेकांना तीनही ऋतूंमध्ये कधीही, कोणत्याही वेळी चहा पिण्याची सवय असते. पावसाळ्यात सगळीकडे गार वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे गरमागरम रुचकर अन्न पदार्थ , पाऊस आणि चहा असेल तर त्याची मजाच वेगळी असते. मात्र जर तुम्ही दुधाच्या चहाऐवजी पुदिना चहा प्यायलात तर? आज आपण पुदिना चहा पिण्याचे आरोग्याला कोणकोणते फायदे आहेत, ते जाणून घेऊयात.
आरोग्य तज्ज्ञ डॉ. सतीश गुप्ता यांनी पुदिन्याचा चहाचे सेवन याबाबत माहिती सांगितली आहे. पावसाळ्याच्या काळात पुदिन्याचा चहा प्यायल्याने आपण अनेक अनेक आजारांपासून आपला बचाव करू शकतो. डॉ. सतीश गुप्ता यांनी पुदिन्याचा चहा प्यायल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात.
पुदिन्याचा चहाचे फायदे
प्रतिकारक शक्ती: डॉ. सतीश गुप्ता यांच्या माहितीनुसार, पावसाळयात पुदिन्याचा चहा प्यायल्याने आपली प्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. पुदिन्यामध्ये अँटीऑक्साइड्स आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे सर्दी-खोकला या आजारांपासून आपल्या शरीराचा बचाव करण्यास मदत करते . त्यामुळे पुदिन्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते.
श्वास घेणे होते सोपे: बदलत्या हवामानामुळे, खास करून पावसाळ्यात अनेकांना सायनस किंवा ऍलर्जीचा त्रास होतो. त्यांच्यासाठी पुदिन्याचा चहा एकदम गुणकारी आहे. यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते. तुम्ही या कालावधीत सायनस व ऍलर्जीमुळे त्रासला असाल तर तुम्ही पुदिन्याचा चहा पिऊ शकता.
पोटासाठी फायदेशीर: पावसाळ्यात अनेकांना अपचन, गॅस, पोट दुखीचा त्रास होतो. पुदिन्याच्या चहाचे सेवन केल्याने हा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
त्वचेसाठी फायदेशीर: डॉ. सतीश गुप्ता यांच्या माहितीनुसार, पावसाळ्यात अनेकांना त्वचेवर रॅशेस आणि ऍलर्जीचा त्रास होतो. पुदिन्याचा चहा प्यायल्यास तुम्हाला यावर आराम मिळण्यास मदत होते. पुदिना शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.