दुर्धर आजारावर तरूणीची मात
मुंबई/नीता परब: बीड जिल्ह्यातून असलेल्या एका १७ वर्षीय तरुणीच्या ह्दयातील कॅन्सरची गाठ काढून टाकण्यात जे.जे. रुग्णालयातील कार्डि ओथाेरासिक अँड व्हॅस्क्युलर सर्जरी (सीव्हीटीएस) विभागाच्या डाॅक्टरांना यश आले आहे. अनुवंशिक असलेल्या या आजाराला ही तरुणी बालपणापासून लढा देत आहे. हदयातील गाठ काढण्याची ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया बालपणापासून आतापर्यंत दाेनवेळा सर जे.जे. रुग्णालयात करण्यात आली आहे. सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असून ती व्यवस्थित चालू-फिरू शकते असे सीव्हीटीएस विभागाच्या डाॅक्टरांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात राहत असलेल्या एका १७ वर्षीय तरुणीला काही महिन्यांपूर्वी अचानक छातीत दुखू लागले हळूहळू वेदना असह्य हाेवू लागल्याने तीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्या विविध चाचण्या केल्या पण प्रकृतीत सुधारणा हाेत नसल्याने पुढील उपचारासाठी सर जे.जे. रुग्णालयात दाखल हाेण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णालयातील कार्डि ओथाेरासिक अँड व्हॅस्क्युलर सर्जरी (सीव्हीटीएस) विभागात दाखल झाल्यानंतर तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या ज्यात तिच्या हदयातील गाठ काढून टाकण्यात यश आले.
तीन वर्षाची असताना ओपन हार्ट सर्जरी
या तरुणीच्या आजाराबराेबरचा संघर्ष तीन वर्षांची असतानाच सुरू झाला होता. त्यावेळी देखील जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या हृदयाच्या डाव्या भागात लेफ्ट एट्रियल मिक्सोमा ही दुर्मीळ गाठ शाेधली हाेती. २०११ मध्ये तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली, एवढ्या लहान वयात अशी मोठी शस्त्रक्रिया सहन करणे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायक हाेते.
पुन्हा एकदा कॅन्सरची गाठ काढण्यास तज्ज्ञ डाॅक्टरांना यश
१४ वर्षांनी या तरुणीच्या हृदयाच्या उजव्या भागात (राईट एट्रियल मिक्सोमा) गाठ झाल्याचे आढळून आले. हदयातील चार कप्प्यांपैकी दुसऱ्या कप्प्यात आढळलेली ही गाठ काढून टाकण्यात आली. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यास विविध तज्ज्ञ डाॅक्टराचा सल्ला घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यास रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अजय भंडारवार, वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संजय सुरासे, सीव्हीटीएस विभागप्रमुख डॉ. आशीष भिवापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरज नागरे (प्रमुख, युनिट व सहयोगी प्राध्यापक,सीव्हीटीएस विभाग) यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांना डॉ. श्रुती दुबे (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. दीपक जैसवाल (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. रूता कक्कड (वरिष्ठ निवासी), डॉ. तनमय पांडे (वरिष्ठ निवासी), डॉ. हेमंतसाई (वरिष्ठ निवासी) यांनी मदत केली. तसेच भूलतज्ज्ञांची जबाबदारी डॉ. अश्विन सोनकांबळे यांनी सांभाळली. राजू दौड व श्रुती पाटील यांनी रक्ताभिसरण व श्वसन यंत्रणेचे व्यवस्थापन केले. परिचारिका तेजस्विनी दिवाणे आणि अंकिता इंगळे यांनी मदत केली. या शत्रक्रियेत गाठ पूर्णपणे काढून टाकण्यात व हृदयातील भित्तीची दुरुस्ती करण्यात आली.
अनुवंशिक आजाराबराेबर लढा
या तरुणीचे वडील आणि आजीलादेखील हदयात गाठ आढळली हाेती. इतकंच नाही तर अनुक्रमे २००७ आणि २०१४ मध्ये तिची आजी आणि वडिलांवरदेखील जे.जे. रुग्णालयातच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या हाेत्या. त्यावेळी गाठ काढण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली असल्याचे डाॅक्टर सांगतात. दरम्यानच्या काळात तिच्या आईला देखील या आजाराचा संघर्ष करावा लागला हाेता. अनुवंशिक तपासणीत ऑटोसोमल डॉमिनंट क्रोमोसोम (पॉइंट म्युटेशन) असल्याचे समोर आले, ज्यामुळे हा आजार पिढ्यान्पिढ्या सातत्याने दिसून येताे.
पोटात गाठी होण्याची कारणे आणि लक्षणे; वेळेत उपचार का आवश्यक? जाणून घ्या
तज्ज्ञ डाॅक्टरांची टिम व तरुणीला जीवनदान
कटीबध्दता, काैशल्य, दूरदृष्टी यांच्या बळावर सरकारी संस्थाही अत्याधुनिक रुग्णसेवा समाजघटाकांपर्यंत पाेहाेचवू शकतात हे यातून सिद्ध झाले आहे. याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आणि मुलीला पुन्हा जगण्याची नवी संधी मिळाली आहे. ही अभिमानास्पद बाब आहे असे डाॅ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, सर जे.जे. रुग्णालय यांनी सांगितले.