फोटो सौजन्य - Social Media
कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असून दरवर्षी मोठ्या संख्येने लोक कॅन्सरमुळे प्राण गमावत आहेत. मात्र, कॅन्सर योग्य वेळी ओळखल्यास त्यावर उपचार करणे शक्य असते. कधी कधी पोट किंवा आतड्यात गाठ तयार होणे याचा अर्थ थेट कॅन्सर असेच समजले जाते, परंतु असे नेहमीच नसते. पोट आणि आतड्यात गाठ तयार होण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. यामुळे या गाठींचे कारण, स्वरूप आणि त्याचा संभाव्य परिणाम समजून घेणे महत्त्वाचे ठरते. गॅस्ट्रिक पॉलीप्स हा पोटात गाठ तयार होण्यामागील एक सामान्य प्रकार आहे. या गाठी पोटाच्या आतल्या अस्तरावर तयार होतात आणि सहसा हानिकारक नसतात. मात्र, काही वेळा या गाठी कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतात. याशिवाय, कॅन्सर हे देखील पोट किंवा आतड्यात गाठी तयार होण्याचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. कॅन्सरमुळे तयार होणाऱ्या गाठी सुरुवातीला लक्षणे दाखवत नाहीत, त्यामुळे त्याचे निदान लवकर होणे कठीण ठरते.
हार्निया हा आणखी एक सामान्य कारण आहे ज्यामुळे पोट आणि आतड्यात गाठी तयार होतात. पोटाच्या भिंती कमकुवत झाल्यामुळे आतड्याचा किंवा इतर मऊ ऊतकांचा काही भाग बाहेर येतो, ज्यामुळे गाठ तयार होते. याशिवाय, लिव्हर मोठा होणे हा देखील गाठी तयार होण्याचा एक कारणीभूत घटक आहे. लिव्हर सिरोसिस, कॅन्सर किंवा सूज यामुळे लिव्हरची समस्या गंभीर होऊ शकते. सुरुवातीला याची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, परंतु वेळीच उपचार न झाल्यास ती समस्या वाढू शकते.
महिलांमध्ये आढळणारी ओव्हेरियन सिस्ट ही समस्या देखील पोट आणि आतड्यात गाठी तयार होण्यास कारणीभूत ठरते. अंडाशयामध्ये तयार होणाऱ्या या सिस्टमुळे महिलांना विविध प्रकारचे त्रास जाणवू शकतात. यामध्ये मासिक पाळी अनियमित होणे, पोटात ताण किंवा अस्वस्थता जाणवणे, तसेच काही वेळा तीव्र वेदनाही समाविष्ट असतात. या सिस्टमुळे पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो, तसेच पोटात गाठीसारखा गोळा तयार होतो, जो बऱ्याच वेळा स्पष्टपणे जाणवत असतो. काही महिलांना गाठीमुळे पाठीचे दुखणे किंवा कंबरदुखीही जाणवते, ज्यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये अडथळा निर्माण होतो. पोट आणि आतड्यात गाठी तयार झाल्यास काही ठळक लक्षणे दिसू शकतात. यामध्ये पोटात सूज येणे, पोट बाहेर मोठे दिसणे, तसेच खोकताना, वाकताना किंवा वजन उचलताना वेदना होणे यांचा समावेश होतो. याशिवाय, काही महिलांना अपचन, वारंवार लघवी लागणे किंवा थकवा जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या गंभीर होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या लक्षणांची वेळेत दखल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पोट किंवा आतड्यात गाठी तयार होण्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास ही समस्या अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या गाठींचे स्वरूप आणि कारण समजणे आता सोपे झाले आहे, त्यामुळे योग्य उपचारांची शिफारस करता येते. लवकर निदान होऊन योग्य उपचार मिळाल्यास या समस्येवर नियंत्रण मिळवता येते आणि गंभीर परिणामांपासून स्वतःला वाचवता येते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय मदत घेणेच श्रेयस्कर ठरते.